नांदेड दि.१३: आज सर्वत्र आनंदाचे,उत्साहाचे व प्रचंड सुखकारक वातावरण आपण पाहतोय. गल्ली ते दिल्ली पर्यंत सर्वत्र भिमजयंतीच्या शुभेच्छा देणारी बॅनर्स झळकत आहेत. बाजारपेठा प्रचंड गजबजलेल्या आहेत. परंतु थोडावेळ भुतकाळात डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला, जो समाज गावकुसाबाहेर उकिरड्यावर रहायचा किंबहुना या व्यवस्थेने त्याला तिथे राहण्यासाठी मजबुर केले होते. स्वताच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी सुद्धा समाजव्यवस्थेतील वरच्या वर्गावर विसंबून राहण्याची तजवीज केली गेली होती. अंगावर निट वस्त्र परिधान करण्याची व समाजात निर्भिडपणे व मुक्तपणे संचार करण्याची मुभा नव्हती. गावगाड्यातील उच्चवर्णीयांची मेलेली जनावरे ओढायची किंबहुना दुसरे पोट भरण्याचे कुठलेच साधन नसल्यामुळे तीच मेलेली जनावरे या परावलंबी माणसांची भूक भागवायची. त्यांना जगण्याचे व उपजीविकेचे साधन या व्यवस्थेने मिळू दिले नाही. मेलेली जनावरे व इतर गलिच्छ कामाशिवाय कोणतेही काम त्यांना मिळू दिले नाही परंतु या समाजाचे रहाणीमान अस्वच्छ असुन ते बरोबर नाही त्यामुळे तो समाज व्यवस्थेत सन्मानाने वागु देण्याच्या लायकिचा नाही. असे बोलुन इथल्या विषमतावादी व्यवस्थेची पाठराखण करणारा चामडी बचाऊ वर्ग आपल्याला आठवतो.
“पाणी वाड गं माय पाणी वाड गं” पासुन सुरु झालेला अस्पृश्यांचा प्रवास आज ” माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला” पर्यंत कसा पोहचला? “गाडीत घ्या हो मला” पासुन….”आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला” इथपर्यंत कसा पोहचला?
या कल्पनाशक्तीच्या पलिकडच्या परिवर्तनामागे एकच शक्ती कारणीभूत आहे ती म्हणजे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर. शिसे, तांबे यांसारख्या धातूंचे चांदीत किंवा सोन्यात रूपांतर करणाच्या प्रयत्नांचे कूटशास्त्र म्हणजे किमया होय. ते काम करणाऱ्या कारागीरांना किमयागार म्हणतात. त्याचप्रमाणे ज्यांना गावात प्रवेश करण्याची मुभा नव्हती ते आज गावाचे कारभार चालवत आहेत. शाळेत शिकण्याची बंदी होती ते त्या शाळांमध्ये मुख्याध्यापक आहेत. ज्या इथल्या व्यवस्थेने कधी त्यांना न्याय दिला नाही ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. ज्या महिलांच्या हातात पाळण्याच्या दोऱ्या होत्या त्यांच्या हातात देशाच्या तिजोऱ्या आहेत. ज्यांना घोटभर पाण्यासाठी तरसावं लागलं ते देशातील लाखो लोकांची तहान भागवत आहेत. ज्यांच्या पुर्वजांनी ज्या हातांनी शेण काढलं, मेलेली ढोरं ओढली,दगड फोडले त्यांच्याच आजच्या पीढ्या त्याच हातांनी मोठ्या उत्साहाने करोडोंची उलाढाल असलेले उद्योग चालवत आहेत, साॅफ्टवेअर बनवत आहेत, देशाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा बनवत आहेत किंबहुना आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. व्यवस्थेच्या ठेकेदारांसमोर आपली लायकी सिद्ध करत आहेत. हा बाबासाहेबांच्या अथक परिश्रम व सामाजिक चळवळीचा कमाल आहे. म्हणून मला डॉ.बाबासाहेब आंबेडकर कवडीमोल माणसांच्या आयुष्याचं सोनं करणारा किमयागार वाटतात.
हे सर्व खरे असले तरी असूनही समाजातील बहुतांश घटक हा विकासाच्या मुख्य प्रवाहात अजून आलेला नाही. यामागील कारणे शोधणे गरजेचे आहे. ज्यावेळी आपल्याला मुख्य प्रवाहात येण्यासाठी उपलब्ध असलेले सर्व दरवाजे बंद होते त्यामुळे आपण विकास साधू शकलो नाही हे समजु शकतो. परंतु बाबासाहेबांनी देशाची राज्यघटना लिहून आपल्यासाठी सर्व दरवाजे उघडे केले. त्यामुळे आता आपणास आपल्या विकासापासून कोणी रोखू शकणार नाही. तरी स्वतः मेहनत करण्याची तयारी ठेऊन आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची संधी सर्वांनी घेतली पाहिजे. कोणावरही अवलंबून न राहता बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन तुम्ही आजच कामाला लागा जगात कुठेही जा तुम्हाला मरण नाही. असे माझे मत आहे.
शेवटी एका कवीच्या कवितेतील दोन ओळी नमुद कराव्या वाटतात,
“बाबा तुमचे विचार जो डोक्यात घेत आहे,
गरूडालाही लाजवेल अशी त्याची झेप आहे”
ही गरूडझेप घेण्याचे बळ आपल्या अंगी येवो आपण आपली स्वतः ची, स्वतः च्या कुटुंबाची व पर्यायाने समाजाची व देशाची प्रगती करो हीच आशा बाळगतो व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद..! मंगेश गाडगे (MSW,LLB), नवी मुंबई
#सत्यप्रभा न्युज #नांदेड