छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !
दि : १३/०१/२०२४
दरवाजांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही वर्षात ’विद्यापीठ गेट’ हे जगभर पोहोचलेले स्वातंत्र्यानंतरचे शहरातील एकमेव प्रवेशद्वार आहे, असे म्हटले जाते. तब्बल पन्नास वर्षांनंतर प्रवेशद्वाराचे सुशोभिकरण होऊन माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते लोर्कापण करण्यात आल्यानंतर रविवारी पहिलाच नामविस्तारदिन साजरा होत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु प्रा.आर.पी.नाथ यांच्या कार्यकाळात १९७१ मध्ये मुख्य प्रवेशद्वार निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन अभियंता के.सी.छाबडा यांनी अवघ्या ३५ दिवसांत ’लोड बेअरिंग’च्या माध्यमातून ’विद्यापीठ गेट’ची निर्मिती केली. २६ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर १९७१ दरम्यान गेटची निर्मिती करण्यात आली. मराठवाडा विकास आंदोलन नामांतर चळवळ यासह अनेक महत्वाच्या घटना घडामोडींचे गेट साक्षीदार ठरले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १४ जानेवारी १९९४ रोजी ’डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार केला. त्यावेळी कुलगुरु डॉ.विठ्ठलराव घुगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा उपस्थितीत नामविस्तारसह फलक लावण्यात आला. तेव्हापासून गेली ३० वर्षे विद्यापीठ गेटला १४ जानेवारी हजारो लोक येतात. याच ठिकाणी सभा, मेळावे व शेकडो पुस्तक विक्रेत्यांची दुकाने देखील थाटली जातात.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चैत्यभूमी (मुंबई), दीक्षाभुमी (नागपूर) या प्रमाणेचे विद्यापीठ गेटचेही ऐतिहासिक महत्व आहे. शहरातील अनेक वार्डात विद्यापीठ गेटच्या प्रतिकृती असून अनेकांच्या घरावर, कार्यालयावरही विद्यापीठ गेटची छबी झळकत असते. अशा विद्यापीठ गेटचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय तत्कालीन कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला. गेटमधून वाहनांची वर्दळ असल्याने नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. गेटच्या दोन्ही बाजूंनी सुशोभिकरण तसेच फुलांची रोपे लावण्यात आली आहेत. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भित्तीचित्रे म्युरल लावण्यात आली. पन्नास वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरणानंतरचे लोकार्पण माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंदजी यांच्या हस्ते २२ जुलै रोजी करण्यात आले. मावळत्या सूर्याच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा शनिवारी सायंकाळी पार पडला. यानंतर हा पहिलाच नामविस्तार दिन साजरा होत आहे. मा कुलगुरु डॉ सुरेश गोसावीयांच्या अध्यक्शतेखाली विद्यापीठातील मुख्य कार्यक्रम होणार आहे.
आनंद आणि अभिमान वाटतोय : कुलगुरु
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील ’चैत्य गवाक्षाची प्रतिकृती’ म्हणाजे सदर गेट आहे. निर्मितीपासून या गेटला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. ऐतिहासिक महत्व असलेल्या विद्यापीठ गेटचे सुशोभिकरण करण्यात आले असून नामांतर शहीद स्मराकाचे कामही सुरु आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाचे प्रतिक म्हजणून ओळखले जाते. तर महामानवाच्या नावाने ओळखले जाणाऱ्या या विद्यापीठाचे गेट हे हजारो अनुयायी यांचे श्रद्धास्थान ठरले आहे. नामविस्तारदिनानिमित्त या सर्वांचे स्वागत आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाल्याचा आनंद आणि अभिमान वाटतोय अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ सुरेश गोसावी यांनी दिली.
सत्यप्रभा न्यूज