नांदेड, दि. 20 :- निवडणूक आचार संहिता काळामध्ये पहाटे सहा पूर्वी आणि रात्री 10 नंतर लाऊड स्पीकर अर्थात भोंगे वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा भंग हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक कार्यक्रम १६ मार्च रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केलेल्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. निवडणुकीच्या कालावधीत ध्वनी प्रदूषणामुळे सर्वसामान्य लोकांची शांतता व स्वास्थ्यास बाधा होऊ नये. उशिरा रात्रीपर्यत ध्वनीक्षपण यंत्रणा चालु ठेवण्याची शक्यता असल्यामुळे निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावर निर्बंध आणण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत.
मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) अन्वये अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावर निर्बंध आदेश 16 मार्च रोजी निर्गमीत केले आहेत. या आदेशात ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांचे परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचारासाठी फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबुनच करावा, ध्वनी क्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. हे सर्व आदेश 6 जून 2024 पर्यत लागू राहतील.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड