नांदेड, दि. ६ : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना राबवितांना येणाऱ्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व सहकार्य करण्यात येइल. जास्तीत जास्त विद्यार्थी/विद्यार्थीनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेवून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची प्रसिध्दी व प्रचार करण्यासाठी नुकतेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
यावेळी मनपाचे उपायुक्त दिवेकर, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, पोलीस निरीक्षक उदय खंडेराये, पोलीस निरीक्षक विजय पुरी, माणिकराव लोहगावे जिल्हा परिषद सदस्य, प्राचार्य बालाजीराव पांडागळे, शंकरराव राठोड, सचिन पवार, रवी जाधव, स्वरुप राठोड व नागरीक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी छत्रपती शाहु महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी केले. विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती यावेळी त्यांनी दिली. त्यामध्ये प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यासाठी इतर मागास प्रवर्गातील गरजु लाभार्थ्यासाठी मोदी आवास घरकुल योजनेचे 23 हजार 598 उदिष्ट ठेवण्यात आले होते. 100 टक्के उदिष्ट पुर्ण केल्याचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी सांगितले. तसेच नांदेड जिल्हयामध्ये 100 मुलांसाठी विष्णुपुरी याठिकाणी तर मुलींसाठी 100 क्षमतेचे शेतकरी चौकच्या पुढे दिपनगर याठिकाणी नवीन शासकीय वसतिगृह सुरु करण्यात आले आहे. या वसतिगृहामध्ये जास्तीत जास्त गरजु विद्यार्थी/विद्यार्थीनिनी प्रवेश घ्यावा असेही आवाहन केले.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमातंर्गत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग नांदेडच्या अधिनस्त असलेल्या देगलूर तालुक्यातून विमुक्त जाती भटक्या जमातीच्या प्राथमिक आश्रमशाळा, शिळवणी बॉर्डर तांडा देगलूर, हदगांव तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, पळसा व हिमायतनगर तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, पोटा बु. हिमायतनगर तालुक्यातून प्रत्येकी शाळेस दित्तीय क्रमाक प्राप्त झाला आहे. यावेळी आश्रशाळेचे मुख्याध्यापक यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे, यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्राध्यापक धारशिव शिराळ यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागा मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचे सादरीकरण केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड