धाराशिव : रात्री 10 नंतर सभा आयोजित केल्याने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या सभांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. धाराशिवमध्ये (Dharashiv) पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान उशीरा सभा घेतल्याने आणि ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीये. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा दंडाधिकारी धाराशिव यांनी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले होते. तरीही धाराशिवमधील वाशीत जरांगे पाटलांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रवीण आप्पासाहेब देशमुख आणि संदीपान नामदेवराव कोकाटे अशी या आयोजकांची नावे आहेत.
धाराशिवमध्ये जरांगे पाटलांच्या सभेच्या दिवशी रात्री 22.00 ते 23.05 पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले होते. पण याचा कालावधीमध्ये धाराशिवमधील वा. सु. हायस्कुल कन्या प्राथमिक शाहा ईट येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं. दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सभा चालू ठेवून आदेशाचे उल्लघंन करण्यात आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीये.
रात्री उशीरपर्यंत जरांगे पाटलांच्या सभांचं आयोजन
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मनोज जरांगे यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागामध्ये मनोज जरांगे यांच्या सभा पार पडतायत. यातील अनेक सभा रात्री उशारीपर्यंत सुरु होत्या. धाराशिवमधील वाशी आणि परंडा तसेच सोलापुरातील करमाळा येथील वांगी तालुक्यातील सभा या रात्री उशीरापर्यंत होत्या. करमाळ्यातील सभा ही तर संध्याकाळी सात वाजता होणार होती. पण या सभेला पोहचण्यासाठी जरांगे पाटलांना पहाटेचे चार वाजले. तरीही थंडीत कुडकुडत मोठ्या संख्याने मराठा बांधव सभेसाठी थांबले होते.
मनोज जरांगेंचा महाराष्ट्र दौरा
मराठा आरक्षणासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं आहे. परंतु त्यानंतर जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर सोडणार नाही, असा इशारा देखील जरांगे पाटील त्यांच्य प्रत्येक सभेतून देत असतात. त्याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी त्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. त्यासाठी राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी सभा घेत आहेत.
दरम्यान मनोज जरांगे यांची 19 नोव्हेंबर रोजी रायगडमधील सभा उशारीपर्यंत घेतली. देहूमधील सभा तर त्यांनी रात्री पावणे चार वाजता घेतली. तसेच आळंदीमधील सभा पहाटे पावणे चार वाजता संपली. पण अद्याप या ठिकाणी जरांगे पाटलांच्या सभांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या ठिकाणी देखील मनोज जरांगे यांच्या सभांचं आयोजन करणाऱ्या आयोजकांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.