नांदेड दि.२६ : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर आता लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. जागावाटपाच्या दिशेनेही हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदा निवडणूक एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी होईल. इंडिया आघाडीत प्रमुख विरोधी पक्षांसह राज्यातील स्थानिक पक्षही सहभागी झाले आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. आघाडी टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या पक्षांना त्याग करावा लागणार आहे. मतविभाजन टाळण्यासाठी स्थानिक पक्षांनाही सोबत घ्यावं लागणार आहे. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी इंडियात येण्यास इच्छुक आहे. परंतु, अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. काँग्रेस नेते अशोक चव्हाण मात्र वंचितला इंडिया आघाडीत घेण्यास सकारात्मक दिसत आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.
अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेसची अखिल भारतीय समिती आहे. आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेसनं एक समिती स्थापन केली आहे. देशभरात ज्या ठिकाणी आघाडी करण्याची चर्चा होत आहे त्यावर समितीच्या आगामी 29 डिसेंबरच्या बैठकीत चर्चा होईल. आमची सकारात्मक भूमिका आहे. जर वंचित बहुजन आघाडीने प्रतिसाद दिला तर त्यांनाही आघाडीत घेतलं पाहिजे ही पहिल्यापासून माझी भूमिका आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी जर सकारात्मक प्रतिसाद दिला तर मला खात्री आहे की त्यांना एकत्र आणून महाराष्ट्रात मतांचं विभाजन निश्चित टाळता येईल. महाविकास आघाडी, प्रकाश आंबेडकर आणि अन्य समविचारी पक्षांना एकत्र आणून भाजपसमोर सक्षम पर्याय दिला जाऊ शकतो. जागावाटपातही त्यांना आपण सामावून घेऊ शकतो असं माझं व्यक्तिगत मत आहे.
29 डिसेंबरच्या बैठकीत वंचितला महाविकास आघाडीत घेण्याबाबत निर्णय होईल का? याबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, या बैठकीत जागावाटपाबाबत धोरण ठरेल. त्यानंतर पक्षनिहाय चर्चेल बसावच लागेल. ही काँग्रेसची अंतर्गत बैठक आहे. यानंतर प्रत्येक पक्षाला चर्चेसाठी आमंत्रित करून पक्षनिहाय अंतिम स्वरुप देता येईल, असे अशोक चव्हाण म्हणाले.
अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला होता. त्यांचा हा दावा चव्हाणांनी फेटाळून लावला. खासदार यांची स्वतःची जागा डळमळीत आहे. परंतु, ते माझ्याबाबत विनाकारण गोंधळाचं वातावरण तयार करत आहेत. भाजपकडून सध्या मतदारसंघांचा सर्वे केला जात आहे. त्यात प्रताप पाटील चिखलीकर यांचा मतदारसंघ धोक्यात दिसत आहे. त्यामुळे ते माझ्याबाबत काहीच कारण नसताना अफवा पसरवत आहेत, असे अशोक चव्हाण म्हणाले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड