नांदेडच्या श्रीनगर भागातील घटना स्कुटीचा झाला चुराडा
नांदेड दि.२८: मागील आठवड्या भरापासून शहरासह जिल्ह्याभरात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे. शहर परिसरातही गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार सुरू आहे. तर या पावसात रस्त्यालगत आणि विविध भागात असलेली अनेक जुनी झाडे मुळासकट उन्मळून पडत आहेत. काही दिवसांपुर्वी न्यायालय परिसरातील झाड उन्मळून पडले होते. यानंतर शहरातील अंत्यत वर्दळीचा भाग असलेल्या श्रीनगर भागातील ब्लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाजवळील रस्त्यालगत असलेले भले मोठे जुने झाड रविवारी अचानक मुळासकट उन्मळून पडले. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास एका बाजूने झुकत हे झाड मुख्य रस्त्यातच आडवे झाले. यात स्कुटीसह एक महिला आणि रस्त्यावरून जाणारा एक पुरूप व दहा वर्षांचा लहान बालक सापडला. यात त्याच्या पावाला गंभीर दुखापत झाली तर अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले. यात त्या स्कुटीचाही चुराडा झाला. तर अन्य नागरिक थोडक्यात वाचावले. ही घटना पाहताच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी धावपळ करून झाडाखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढून तातडीने रूग्णालयात पाठवून दिले, असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगीतले. ही माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाला मिळताच अधिकारी केरोजी दासरे आपल्या जवानांसह दाखल झाले. अवघ्या काही वेळात कटरच्या मदतीने झाडाच्या मोठ्या फांद्या कापून झाडाचा बुंदा बाजूला केला. तोपर्यंत उद्यान विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान जखमी झालेल्या लहान बालकाचे नाव यश गुप्ता रा. जवाहरलाल नगर नांदेड असे असून एका खागसौ रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा दुपारी मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे.
चौकट :
मनपाच्या उद्यान विभागाचे दुर्लक्ष दरम्यान शहरातील शिवाजी नगर, श्रीनगर, तरोडा नाका ते छत्रपती चौक, भावसार चौक यासह अन्य काही प्रमुख रस्त्यावर अनेक वर्ष झालेली झाडे आहेत, यातील काही झाडे एका बाजूने झुकत आहेत तर काळी झाडांच्या मुळा बाहेर पडल्या आहेत. यामुळे ती कोसळण्याची शक्यता वाढली आहे. परंतू झाडांचे संगोपन आणि काळजी घेणाऱ्या महापालिकेच्या उद्यान विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अशा घटना घडत आहेत. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्यापुर्वी कमकुवत झाडांची माहिती घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड