नांदेड दि.४: जनसामान्य व्यक्तीसारखा जगण्याचा अधिकार संविधानाने दिव्यांगाना दिला असून दिव्यांगाना चांगली वागणूक देण्याची जबाबदारी समाजाची सुद्धा असल्याचे मनोगत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या. श्रीमती दलजीत कौर जज यांनी कुसुमताई चव्हाण सभागृहात आयोजित दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमात केले आहे.
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून सतत दोन दिवस दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यकामाचे आयोजन जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले होते.
शहरातील कुसुमताई चव्हाण सभागृहात मंगळवारी दिव्यांगाचा अस्थिव्यंग, मतिमंद, मूकबधिर, अंध या चार प्रवर्गाचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या. श्रीमती दलजीत कौर जज, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी बापू दासरी, डॉ.अजय मालपाणी, कमलजीत, प्रकाश नेहलानी, ओमप्रकाश गिल्डा हे उपस्थित होते. तर परीक्षक म्हणून डॉ. प्रमोद देशपांडे, प्रा. रमाताई करजगावकर , चंद्रकांत अटकळीकर, दीप्तीताई उबाळे यांनी परीक्षण केले. या सांस्कृतिक कार्यक्रमात दिव्यांगाच्या 55 शाळेतील दिव्यांग मुलामुलींनी सहभाग घेतला.देशभक्तीपर गीत , लावणी, सामाजिक प्रबोधनपर गीत, शेतकरी आत्महत्या, विविध चित्रपटातील गीतावर दिव्यांग मुला मुलींनी नृत्य सादर करून उपस्थितीतांची मने जिंकली.दिव्यांग मुलामुलींच्या नृत्याला प्रेक्षकातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड