लातूर प्रतिनिधी!विजय पाटील !
दि : १६/०३/२०२४
लातूर (Latur) : लातूरमधून लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नावावर महाविकास आघाडीत चर्चा सुरू असून, लातूर काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्त्वानेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांंच्या नावाचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे पाठविला आहे. असे झाले तर डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाचा सन्मान करण्याची संधी लातूरकरांना चालून येणार आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपाने विद्यमान खा. सुधाकर शृंगारे यांना पुन्हा उमेदवारी देत पक्षासाठी निवडणूकपूर्व आलेल्या सातही सर्वेक्षणाचा ‘सन्मान’ केला आहे. कदाचित् शृंगारे यांच्या उमेदवारीने काही नाराज नेते काँग्रेसच्या संपर्कात असतीलही; मात्र काँग्रेस अंतर्गत चाललेल्या घडामोडी लातूरच्या नेतृत्त्वाला प्रदेश पातळीवर मोठे मैदान तयार करुन देणाऱ्या ठरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ॲड. प्रकाश आंबेडकर यांना लातूरमधून उमेदवारीची मागणी करणारा एकमुखी प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे पाठविल्याची खात्रीलायक बितंबात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे देशातील वंचित समाजघटकाचे नेते आहेत. गेली अनेक वर्षे प्रस्थापितांच्या विरुध्द त्यांचा लढा सुरू आहे. हे करताना गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी राज्यातील ओबीसी समाजघटकाला आपलेसे करण्यात मोठी मजल मारली आहे. त्यामुळे यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या मतांच्या टक्केवारीत वाढ होणार आहे. समाजघटकांतील या कामगिरीसोबत त्यांचा भारतीय संविधानाचा गाढा अभ्यास असून ते कायदेतज्ञही आहेत. शिवाय सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ते डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत.
निलंगा, उदगीर व अहमदपूरमध्ये सध्या महायुतीचे आमदार आहेत तर लातूर शहर, लातूर ग्रामीण व लातूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार आहेत. जिल्ह्याचा विचार केला तर अहमदपूर व उदगीरमध्ये काँग्रेसच्या जीवावर निवडून आलेले आमदार आहेत, शिवाय मागच्या घडामोडीत जनमत बरेच ढवळून निघाले आहे. त्यातच काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात वंचित’ला सन्मान देण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे. काँग्रेस हायकमांडने हा प्रस्ताव मान्य केला व ॲड. आंबेडकरांनी तो स्वीकारला तर लातूरच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासाला आणखी एक महत्त्वपूर्ण नोंद घ्यावी लागेल. असे झाल्यास राज्य पातळीवर आ. अमित देशमुखांच्या नेतृत्त्वाचा लौकिक आणखी वाढणार आहे.
सत्यप्रभा न्यूज