नांदेड दि.२८: देगलूर तालुक्यातील करडखेड येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत भ्रष्टाचार करण्यात आल्यामुळे करडखेडच्या ग्रामस्थांनी पंचायत समिती देगलूर समोर आज उपोषणाला बसले होते. बोगस एम. बी. करुन गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले असल्याचा उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. गुत्तेदार व संबधित अभियंता यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार केल्यामुळे ही योजना नेमकी कोणाच्या फायद्याची ठरते असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला होता. मात्र गावकरी उपोषणाला बसताच प्रशासनाला खडबडून जाग आली. जी कामे पूर्ण झाली नाहीत अथवा अर्धवट कामे आहेत ते लवकरच पुर्ण करु असे लेखी स्वरूपात प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी सरपंच प्रतिनिधी गणपत शिळवणे, उपसरपंच व्यंकट गोणेवार, किशन पांचाळ, श्रीनिवास मंदिलवार, सुरेश चिटकुलवार हाणमंत चिनगुलवार, दिपक पाटील, अशोक कोकणे, अरविंद गड्डमवार, फयाज शेख, अंकूश सुर्यवंशी, दिगंबर कोकणे उपोषणाला बसले होते तर या उपोषणास भारत राष्ट्र समितीचे कैलास येसगे आणि युवा मोर्चा भाजपाचे तालुका अध्यक्ष नामदेव पाटील थडके यांनी पाठिंबा दर्शविला होता.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड