विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.२८ : छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात काँग्रेसने आधी मधुकर देशमुख यांना उमेदवारी दिली होती. देशमुख यांच्या गळ्यात घातलेला हार २४ तासांतच काढून घेऊन लहू शेवाळे यांच्या गळ्यात घालण्यात आला. शेवाळे यांना पूर्वमधून उमेदवारी देताना कोणते गणित काँग्रेसने समोर ठेवले हे समजायला मार्ग नाही. त्याआधी मधुकर देशमुख यांना उमेदवारी देताना कोणते गणित ठेवले होते, याचा उलगडा होण्याआधीच पुन्हा दुसरी गुगली काँग्रेस श्रेष्ठींनी पूर्वच्या मतदारांसमोर टाकली आहे. दुसरीकडे मुस्लिम उमेदवार द्यावा म्हणून मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीलाही केराची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे मुस्लिम पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम आहे.
पूर्व मतदारसंघात अतुल सावे ओबीसी उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर मराठा उमेदवार देऊन एकप्रकारची खेळीच काँग्रेसने खेळली होती. मराठा मते देशमुख यांना मिळाली असती. पूर्वमध्ये एमआयएमने इम्तियाज जलील हे सक्षम उमेदवार दिले आहेत. भाजपने अतुल सावे हे सक्षम उमेदवार दिले आहेत. त्यातुलनेत काँग्रेसने उमेदवार देताना दुसऱ्यांदा गडबड तर केली नाही ना, अशी शंका यायला बराच वाव आहे.
पूर्व मतदारसंघात आता दुहेरी लढत होणार आणि ती सावे आणि जलील यांच्यातच होणार हे आता स्पष्ट झाले आहे. स्पर्धेत मराठा उमेदवार नसल्याने या दोन्ही उमेदवारांचे फावले आहे, अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे. मनोज जरांगे यांच्या मुस्लिम-मराठा युतीचा फॅक्टर चालला तर जलील यांचा मार्ग सोपा होतो, पण या युतीबाबत अजून स्पष्टता नाही. तशी घोषणाही झालेली नाही. त्यामुळे रंगत अधिकच वाढणार आहे. ही लढाई अधिकच संघर्षपूर्ण होणार, हे आताच दिसून येत आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर