एसएफआयचा आंदोलन करण्याचा इशारा
नांदेड दि.२४ : टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई (टीआयएसएस) ने कॅम्पसमध्ये बंदी घातलेल्या बीबीसी डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग करणे,विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठविणे, निषेध सभांमध्ये भाग घेणे यासह विविध घटनांचा हवाला देत विद्यार्थी नेते रामदास पी.एस यांना टिस्स प्रशासनाने दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे.त्याचे पडसाद आता नांदेड विद्यापीठात देखील उमटत आहे.२२ एप्रिल रोजी सोमवारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.मनोहर चासकर यांच्या मार्फत टिआयएसएसच्या कुलगुरूना निवेदन पाठवून एसएफआयने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.रामदास यांचे निलंबन तत्वरित रद्द करावे,अन्यथा टिस्स कँम्पस समोर आंदोलन करू असा इशारा नांदेडच्या एसएफआय विद्यापीठ कमिटीने दिला आहे.
टिस्स मधील संशोधक दलित विद्यार्थी रामदास पी.एस हा विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी नेहमी आवाज उठून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असे, सत्ताधारी भाजपवर प्रश्न उपस्थित करीत असल्याने टीआयएसएस प्रशासनाने याला ‘देशविरोधी कृत्य’ घोषित करून हे निलंबन केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरलेला माहितीपट ‘राम के नाम’ पाहण्यासाठी रामदासने विद्यार्थ्यांना आवाहन केले होते. आणि हे करणे टीआयएसएसच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे प्रशासनाचे मत आहे.रामदास यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याच्या दीड महिन्यानंतर निलंबनाची नोटीस आली होती.’युनायटेड स्टुडंट्स ऑफ इंडिया’च्या नेतृत्वात आयोजित १२ जानेवारी २०२४ रोजी नवी दिल्ली येथे ‘संसद मार्च’मध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांच्यावर दोन वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली.ही कारवाई करणे म्हणजे विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे.असा आरोप स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)नांदेड विद्यापीठ कमिटीने केला आहे.
रामदास, दलित समाजातून आलेला विद्यार्थी कार्यकर्ता आणि टीआयएसएस मधील पीएचडी स्कॉलर आहे.त्याचा दोन वर्षांसाठी बेकायदेशीरपणे निलंबन करून टीआयएसएसच्या संपूर्ण परिसरामध्ये त्यांना प्रतिबंधित करण्यात आल्याने राज्यभरातील वेगवेगळ्या डाव्या विद्यार्थी संघटना आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.रामदास हे प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम (पीएसएफ)PSF चे माजी सरचिटणीस आहेत. सध्या ते एसएफआयच्या SFI केंद्रीय कार्यकारी समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य समितीचे सहसचिव आहेत. रामदास हे त्यांच्या कुटुंबातील पहिल्या पिढीतले असे विद्यार्थी आहेत, जे इथपर्यंत पोहोचले आहेत. रामदास यांनी परिसरातील विद्यार्थ्यांच्या हक्कांचे रक्षण केले आणि सर्व विद्यार्थी संघटनांमध्ये संयुक्त मंच आणि एकजूट निर्माण करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. ते ‘युनायटेड स्टुडंट्स ऑफ इंडिया’चे प्रतिनिधी देखील आहेत.टीआयएसएस प्रशासनाने सर्वांसाठी वसतिगृहे देण्यास नकार दिला, फी वाढवली आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील कार्यक्रमांवर बंदी घातली, त्याचवेळी प्रशासनाने संशोधक विद्यार्थ्याच्या भविष्यावर क्रूर हल्ला देखील केला आहे.असा आरोप एसएफआयने केला आहे. रामदास पी.एस.यांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे अन्यथा टाटा सामाजिक विज्ञान संस्थान मुंबई (टीआयएसएस) कँम्पस समोर एसएफआयच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एसएफआय या विद्यार्थी संघटनेने दिला आहे.
या निवेदनावर एसएफआयचे काॅ.मिना आरसे, राहुल पवळे, गजानन पडोळे, रामदास बाऱ्हाळीकर, चिराग घायळे, सचिन पवळे, सचिन दाढेल, शंकर शिंगारपुतळे, स्नेहा कांबळे,नागराज चावरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड