दोन दिवसात साडेचार किलो चांदी जप्त ; आतापर्यंत 58 लाखाच्या विविध वस्तू जप्त
नांदेड दि. १३ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. चारही निवडणूक निरीक्षक तपासणी संदर्भात जागरूक असून काल पासून दोन दिवसात साडेचार किलो चांदी पकडण्यात आली आहे. आचारसंहिता लागल्यापासून जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत २६ लाखाचे मद्य, ५८ लाखाच्या विविध भेटवस्तू, अडीच लाखाचे अमली पदार्थ, चार लाखाची रोकड पकडण्यात आली आहे. जिल्ह्यातील जप्ती प्रकरणातील आढावा आज सर्वसामान्य निरीक्षक शशांक मिश्र, पोलीस निरीक्षक जयंती आर. खर्च निरीक्षक डॉ. दिनेशकुमार जांगिड, खर्च निरीक्षक मग्पेन भुटिया यांच्यासह जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत पैशांचा गैरवापर, मद्याचा मोफत पुरवठा, भेट वस्तूंचा वाटप, किंवा कोणतेही आमिष दिले जाऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनासह इन्कम टॅक्स, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, राज्य वस्तू आणि सेवा कर, व्यावसायिक कर, अंमलबजावणी संचालनालय,अमली पदार्थ नियंत्रण दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल, इंडो तिबेट सीमा दल, पोलीस दल केंद्रीय, औद्योगिक सुरक्षा दल, आसाम रायफल्स, भारतीय किनारा दल, रेल्वे संरक्षण दल, पोस्ट विभाग, वन विभाग, नागरी उडुयन विभाग, विमानतळ प्राधिकरण, राज्य नागरी विमान वाहतूक विभाग, राज्य परिवहन विभाग, यांच्यासह विमुक्त फिरते पथक ( एफएसटी ) स्टॅटिक सर्विलन्स टीम ( एसएसटी ) कार्यरत आहेत.
११ एप्रिलला अडीच किलो चांदी
11 एप्रिल च्या रात्री लातूर नांदेड महामार्गावर डेरला पाटी या परिसरात वाहने तपास करत असताना दोन किलो 671 ग्रॅम चांदी पकडण्यात आली. छोट्या चेनच्या स्वरूपात चांदीच्या वस्तू तयार करण्यात आल्या होत्या.
सदर कार्यवाही ही 87 नांदेड दक्षिण मतदार संघ मधील फ्लाईंग स्कॉड क्रमांक चार यांनी केली आहे.सदर फिरते पथकाचे प्रमुख प्रकाश कांबळे सहाय्यक, विठ्ठल तिडके हेड पोलीस कॉन्स्टेबल ,पवळे व्हिडिओग्राफर, जोंधळे यांनी केली .सदर कार्यवाही करीत असताना डीएसएफ पथक क्रमांक एकचे नागनाथ पतंगे व पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते. तसेच फिरते पथक क्रमांक तीनचे प्रमुख संघरत्न सोनसळे, सहाय्यक यशवंतकर हेही उपस्थित होते.
१२ एप्रिलला २ किलो चांदी ४ लाख रोकड जप्त
12 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता झालेल्या कारवाई मध्ये 2.8 किलो चांदी व ४ लाख २० हजाराची रोकड पकडण्यात आली. 87 नांदेड दक्षिण मतदार संघ मधील फिरते पथकाचे प्रमुख खुशाल कदम सहाय्यक, पुंडलिक मोरे, हेड पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत मदने, व्हिडिओग्राफर इंगोले, हे इतवारा भागात नाव घाट परिसरामध्ये वाहनाची तपासणी करताना रोख रक्कम चार लाख वीस हजार व चांदी 2.08 किलोची सापडली. याबाबत वाहनधारकास पावती दाखवण्याबाबत सांगितले असता त्यांच्याकडे ती उपलब्ध नसल्यामुळे सदर रक्कम व चांदी कोषागार कार्यालयात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशान्वये जमा करण्यात आले आहे.
आतापर्यंत 26 लाखाचे मद्य जप्त
दरम्यान ,आचारसंहिता लागल्यापासून नांदेड मतदार संघामध्ये 26 लाख रुपये यांचे मद्य आतापर्यंत जप्त करण्यात आले आहे. उत्तेजक द्रव्य समजले जाणारे गांजा व तत्सम उत्तेजक द्रव्य 2.29 लक्ष रुपयांचे जप्त करण्यात आले आहे तर 58 लक्ष रुपयांच्या विविध मौल्यवान वस्तू आतापर्यंत जप्त करण्यात आल्या आहेत. निवडणूक काळात प्रत्येक वाहनाची कसून तपासणी होत असून दररोज हा अहवाल निवडणूक विभागाला सादर केला जात जात असल्याची माहिती सि-व्हिजीलकक्षाकडून माहिती प्राप्त झाली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड