विजय पाटील
लातूर दि .६: अर्चनाताई पाटील मला वाटलं म्हणून मी भाजपात गेले. आई-वडिलांचे आशीर्वाद असल्याशिवाय मुलगी घराची चौकट (उंबरठा) ओलांडत नाही, असे म्हणत आपल्या राजकीय (भाजपामधील) वाटचालीला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकरांचे समर्थन असल्याचे स्पष्ट संकेत अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. रविवारी भाजपा नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी लातूर येथे पत्रकारांसाठी झालेल्या स्नेहमिलन कार्यक्रमात बोलताना हे संकेत दिले. माझा हा पहिला राजकीय प्रवास आहे. मला वाटले म्हणून मी भाजपामध्ये प्रवेश केला. पक्षात प्रवेश केल्यापासून सर्व पत्रकारांना एकत्रित भेटणे झाले नाही, त्यामुळे आजचा हा योग असल्याचे त्यांनी सांगितले.
चाकूरकरांच्या समर्थनाचे दिले संकेत!
आपण भाजपात प्रवेश केला. गेली तीस वर्षे आपण पडद्यामागे होतो. मात्र आता प्रत्यक्षात समोर येऊन राजकीय प्रवास सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण शहर विधानसभा मतदारसंघात जनसंपर्कात आहोत. भाजपाकडे अधिकृत उमेदवारी मिळावी, यासाठी आपण मागणी केली आहे, आपले प्रयत्न सुरू आहेत. पक्षाचा जो निर्णय होईल, तो मला मान्य राहील, असेही त्यांनी सांगितले.
लातूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. याप्रश्नी जनता आणि प्रशासनाची तितकीच जबाबदारी आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. या प्रश्नांवर एकत्रित बसून चर्चा करून निर्णय घेणे शक्य होईल, असे मला वाटते असे त्या म्हणाल्या. पक्षाच्या सर्व नेत्यांना कल्पना देऊनच मतदारसंघात फिरत आहे. केंद्रीय वरिष्ठ नेते, राज्यातील नेते व स्थानिक नेते या सर्वांनाच लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्काबाबत आपण कल्पना दिलेली आहे, असेही त्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना म्हणाल्या.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे आपल्या प्रचारासाठी येतील का? असा प्रश्न अर्चनाताई पाटील यांना विचारला असता त्या म्हणाल्या, सगळ्या प्रश्नांची उत्तरे वेळच देत असते. योग्य वेळ आल्यावर त्याचे उत्तर मिळेलच! सकाळीच आम्ही घरून निघत असताना साहेबांनी ‘मला पत्रकार परिषदेला यायचे आहे का?’, असा प्रश्न केल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला.
#सत्यप्रभा न्यूज # लातूर