विजय पाटील
वैजापूर दि.१९:विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून उद्धव ठाकरे गटात गेलेल्या डॉ. दिनेश परदेशी यांची वैजापूरमधून उमेदवारी निश्चित झाली आहे. शिंदे गटाकडून विद्यमान आमदार रमेश बोरनारे रिंगणात राहणार आहेत. याशिवाय माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनीही मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली असून, ते पक्षाच्या शोधात आहेत. वेळप्रसंगी ते अपक्षही रिंगणात उतरू शकतात. या स्थितीत वैजापूर मतदारसंघातील लढत ही तिरंगी होण्याची शक्यता आहे.
वैजापूर मतदारसंघात २०१९ ची निवडणूक महायुती असताना शिवसेनेने लढवली होती. प्रा. बोरनारे यांचा तब्बल ९८ हजार मतांनी विजय झाला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय पाटील यांचा ५९ हजार मतांनी पराभव केला होता. गेली निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्ररित्या लढवली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला २१ हजार मते मिळाली होती. याशिवाय वंचितच्या उमेदवाराने १० हजार मते घेतली होती. प्रा. बोरनारे हे शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून कोण लढणार याबद्दल उत्सुकता होती.
निष्ठावंत इच्छुकांनी तशी तयारीही सुरू केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी भाजपमधून आलेल्या डॉ. दिनेश परदेशी यांना पक्षात घेत त्यांना उमेदवारीही दिली आहे. त्यामुळ निष्ठावंत सैनिक नाराज झाले आहेत. डॉ. परदेशींना पक्षात प्रवेश देणार असल्याचे कळताच माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनीही गेल्या ५ वर्षांत मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी केलेली आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी आशा शिवसैनिकांना होती. आता त्यांनी उमेदवारीसाठी अन्य पक्षाचा शोध सुरू केला आहे. वेळप्रसंगी ते अपक्षही उभे राहू शकतात. असे झाले तर वैजापूरमध्ये तिरंगी लढत होईल, असे चित्र आहे.
भाजपचे एकनाथ जाधवही इच्छुक
बोरनारे-परदेशी-चिकटगावकर अशा तिरंगी लढतीची शक्यता असताना चौथा खेळाडूनही मैदानात गाजविण्याची शक्यता आहे. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव यांनीही रिंगणात उतरण्याची तयारी केल्याचे सांगण्यात येते. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. महायुतीत ही जागा शिंदे गटाला जाणार असल्याने त्यांचे बंड कायम राहीलच, याबद्दल मात्र साशंकता आहे. याशिवाय एमआयएम, वंचित आणि मनोज जरांगे समर्थकही रिंगणात असेल, असे सध्याचे चित्र आहे. हे उमेदवा कुणाच्या पथ्यावर पडतात, कुणाला नुकसान पोहोचवतात हे बघणे रोमांचक ठरणार आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर