नांदेड दि २९: मिस्त्री काम करणाऱ्या एका युवकाच्या डोक्यात फावडे मारून त्याचा खून केला. किनवट तालुक्यातील अंबाडी गावामध्ये बुधवार दि. 29 मे रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये वसीम शेख मेहबूब कुरेशी रा. इस्लामपुरा, किनवट हा 22 वर्षाचा युवक जागीच मृत्युमुखी पडला.
अंबाडी येथे उत्तम गणपत भरणे याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर वसीम शेख मेहबूब कुरेशी हा मिस्त्री म्हणून कामाला होता. पिण्याचे पाणी मागण्याच्या कारणावरून आरोपी उत्तम भरणे आणि वसीम शेख यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर उत्तम गणपत भरणे याने वसीम शेख मेहबूब कुरेशी याला फावड्याने त्याच्या डोक्यात, पोटावर निर्दयीपणे मारहाण केली. या मारहाणीत वसीम शेख हा जागीच मरण पावला. याशिवाय या घटनेत विशाखा भारत मुनेश्वर, वय 53 वर्षे, रा. अंबाडी या महिलेलाही फावडे मारून उत्तम भरणे याने जखमी केले. तिला तेलंगणा राज्यातील आदीलाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेने किनवट परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, मयत वसीम शेखचे प्रेत जवळपास 300 ते 400 लोकांच्या जमावाने किनवट पोलीस ठाण्यात आणल्यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आरोपी उत्तम भरणे याला पोलिसांनी तात्काळ अटक करताच तणाव निवळला. प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. किनवटचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला आणि त्यांच्या टीमने या प्रकरणाला योग्य पद्धतीने हाताळले.
दरम्यान आरोपी उत्तम गणपत भरणे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंत सुरू होती.
कायदा हातात घ्याल तर कारवाई : कोकाटे
किनवट तालुक्यातील अंबाडी येथे या घटनेतील आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी तेथे दाखल झाले आहेत. पोलिस प्रशासन कायदेशीर काम करीत असतांना विनाकारण जमाव जमवून कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाईल. यामुळे नागरिकांनी शांतता ठेवून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड