विजय पाटील
करमाड दि.२: शेंद्रा एमआयडीसीतील रॅडिको या मद्यनिर्मिती कंपनीत मका साठवणुकीची महाकाय टाकी (गव्हाण) फुटून झालेल्या भीषण दुर्घटनेत चौघांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणात पोलिसांनी कंपनीच्या २ अधिकाऱ्यांसह ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. तेव्हापासून हे तिघेही संशयित फरारी असून, त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आहे.
सहायक व्यवस्थापक (सुरक्षा) सुरेंद्र खैरनार, सहायक व्यवस्थापक (देखभाल दुरुस्ती) महादेव पाटील आणि ठेकेदार ज्ञानेश्वर रिठे अशी फरारी असलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांचा शोध करमाड पोलीस घेत आहेत. पुरेशी साधनसामग्री न देता धोक्याच्या ठिकाणी त्यांना काम करायला भाग पाडल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. तिघांच्या वतीने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने शनिवारी (३० नोव्हेंबर) हा रद्द फेटाळला.
रॅडिको मद्यनिर्मिती कंपनीत साडेतीन हजार टन मका असलेली भलीमोठी टाकी (सायलो) फुटून मकाच्या ढिगाऱ्याखाली दबून दत्तात्रय बोढरे, किसन हिरडे, संतोष पोपळघट आणि विजय गवळी या चार कामगारांचा दबून मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार श्री. जाधव करत आहेत.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर