उदित राज पुढे बोलताना म्हणाले, देशात 1949 ते 1990 काळात आरएसएस, जनसंघ आणि हिंदू महासभा काय करत होते? जर मंडल आयोग आला नसता तर राम मंदिर आज झालंच नसतं. त्यावेळी मागासवर्गीयांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनीच हवा दिली होती, हे खरं सत्य असल्याचा आरोप उदित राज यांनी केला आहे. तसेच येत्या 22 जानेवारीला राम मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आमच्या कलयुगाची सुरुवात होणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
मागील हजारो वर्षांपासून दलित गावाच्या बाहेरच राहत होते. उच्चवर्णीय लोकं त्यांची सावलीदेखील अपवित्र मानत असत. हजारो वर्षांपासून भगवान राम-कृष्ण होते तर आमची अवस्था काय झाली होती? पण 22 जानेवारीनंतर कलियुग सुरु होणार आहे. सर्व जातीवादी आणि आरक्षणाला विरोध करणारे राम मंदिरापर्यंत पोहोचणार असून दलित आणि मागासवर्गीयांचं कलियुग आता सुरु होणार असल्याचंही उदित राज यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राम मंदिर लोकार्पणाच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टकडून देशभरातील अनेक नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. काँग्रेसच्याही अनेक नेत्यांना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं असून काँग्रेसच्या हाय कमांड नेत्यांकडून या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यात आल्याचं दिसून आलं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह जयराम रमेश यांना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, काँग्रेसचे हे नेते सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर काँग्रेसचं शिष्टमंडळाला पाठवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. राम मंदिर मुद्द्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपलेली असतानाच आता काँग्रेसचे नेते उदित राज यांनी वादग्रस्त विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड