मुंबई दि. ३०: आमचा प्रयत्न होता की, या लोकसभेतच भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी निर्माण व्हावी. परंतु दुर्दैवाने आम्हाला जशी पाहिजे तशी आघाडी होताना दिसत नाही. म्हणून विविध संघटनांशी बोलून दोन तारखेपर्यंत भाजप विरोधातील मजबूत आघाडी उभी करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. शुक्रवारी मुंबई येथे ‘वंचित’ची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकार परिषद: शिवसेना-काँग्रेसचं सुत जुळलेलच नाही; मविआ आणि संजय राऊत वेगवेगळे
महाविकास आघाडी वेगळी आहे आणि संजय राऊत वेगळे आहेत. आम्ही ज्यांना लक्ष्य केले ते संजय राऊत होते. कारण संजय राऊत चुकीचे वक्तव्य करतात म्हणून आम्ही म्हणालो की, संजय राऊत हे आघाडीत बिघाडी करत आहेत. आम्हाला महाविकास आघाडीने केवळ तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यात एक अकोला आणि दुसऱ्या दोन जागा यापलीकडे आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. प्रसारमाध्यम आणि समाजमाध्यमात ‘वंचित’विषयी गैरसमज पसरवल्या जात आहे, तीन जागांच्या प्रस्तावाशिवाय इतर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. ‘मविआ’मध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांचं सुत जुळलेलच नाही हे आता उघड होत आहे, असेही मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले. आजघडीला महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांची संख्या १४ लाखाच्या आसपास आहे. या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ केली पाहिजे. पाच वर्षांत ती २२ लाखांवर गेली पाहिजे; तेव्हाच शासन व्यवस्थितरित्या चालू शकेल. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत जो कर्मचारी आणि अधिकारी राबत आहे, अशांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ५८ वर्षे वयापर्यंत निवृत्त करायचे नाही असा आमचा अजेंडा ठरत असल्याचे वक्तव्य अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रकार परिषदेत केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड