आमदार राजेश पवार यांच्या प्रयत्नांना यश
धर्माबाद ता. प्र.दत्तात्रय सज्जन दि.३ : धर्माबाद शहरासाठी नवीन शुद्ध पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल ७१ कोटी ५८लक्ष रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाने नगरोत्थान महाअभियान या योजनेअंतर्गत मंजूर केला असून आमदार राजेश पवार यांनी दिलेला शब्द व त्या दिशेने प्रयत्नाची पराकष्टा केल्यामुळे त्यांना मिळालेले यश यामुळे धर्माबाद शहरात सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले असून त्यांच्यावर कौतुकाचा पाऊस पडत आहे.
आमदार राजेश पवार हे तेलंगाना सीमेवर वसलेल्या आपल्या मतदारसंघातील टुमदार अशा धर्माबाद शहराबद्दल नेहमीच गौरवोद्गार काढत आलेले आहेत. धर्माबाद शहराची भौगोलिक रचनाच एवढी सुंदर आहे की आतापर्यंत या शहराचा चेहरा मोहरा बदलला असता एवढ्या सुख सुविधा इथे उपलब्ध करून देता आल्या असत्या.पण मागील काळातील राजकीय नेत्यांना इच्छाशक्तीच नसल्यामुळे शहराचा विकास होऊ शकला नाही.
त्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पवार हे धर्माबाद शहराचा सर्वांगीण विकासा संदर्भात प्रयत्नाची पराकाष्टा करीत असून मूलभूत व पायाभूत सुविधा पुरवणे व त्यांचा दर्जा वाढवणे यासाठी आमदार राजेश पवार हे प्रयत्न करीत होते व त्यांनी धर्माबाद शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजने संदर्भात दोन वर्षापासूनच डॉ.कमलकिशोर काकानी, माजी उपनगराध्यक्ष सखाराम निलावार, स्वर्गवासी विनायकराव कुलकर्णी व त्यांचे चिरंजीव वैभव कुलकर्णी सोबत त्यांचे पीए कृष्णा मुळी,बाजार समितीचे संचालक गोविंद जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांना जाहीर कार्यक्रमात शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पूर्ण करताना नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी नीलम कांबळे व विद्यमान मुख्याधिकारी सतीश पुदाके यांना नगरपालिका स्तरावर पाठपुरावा करायला सांगितला होता व मंत्रालयीन पाठपुरावा स्वतः आमदार राजेश पवार हे करत होते. १८ ऑक्टोबर २०२३ च्या सुधारित मागणी पत्रकाप्रमाणे नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत आमदार राजेश पवार यांनी धर्माबाद नगरपालिका कार्यकक्षेतील पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल ७१ कोटी ५८ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून घेण्यात यश मिळवले आहे. यामध्ये राज्य शासना मार्फत अनुज्ञेय अनुदान तब्बल ९५ टक्के म्हणजेच (प्रकल्प किमतीच्या) ६८ कोटी इतके भरत असून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिकेचा सहभाग तीन कोटी ५८ लक्ष रुपयाचा आहे.
उपरोक्त पार्श्वभूमीवर धर्माबाद नगरपालिका अंतर्गत रत्नाळी, बाळापूर, धर्माबाद शहरातील सर्वच प्रभागातील शुद्ध पिण्याच्या मुबलक पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागला असून त्या संदर्भात सोशल मीडियावर व वैयक्तिक आमदार राजेश पवार यांच्यावर कौतुकाचा पाऊस पडत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड