विजय पाटील | छत्रपती संभाजीनगर | दि.२४ | सरकारला दिलेल्या वचनांचा विसर पडला असून, जूनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्याला घेराव घालण्यात येईल, अशी घोषणा प्रहार पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात बुधवारी (२३ एप्रिल) प्रहार पक्षाचा विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी राज्य अभियान प्रमुख महेश बडे, विभागीय निरीक्षक घनश्याम पेठे, शहराध्यक्ष कुणाल राऊत, सुधाकर शिंदे, दिव्यांग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, शेतकरी संघटनेचे अनिल पालोदे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, अहिल्यानगर येथील जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बच्चू कडू म्हणाले, की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, लाडक्या बहिणीचे मानधन २१०० रुपये आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू, असे वचन महायुती सरकारने दिले होते.
आश्वासने देऊन मते मिळवली. आता ते बोलण्यास तयार नाही. त्यामुळे आता या नेत्यांना सळो की पळो करून सोडण्याची वेळ आली आहे. १४ मे रोजी कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांच्या घरासमोर रक्तदान शिबीर घेतले जाईल. त्यानंतरही सरकारने कोणतीही दखल घेतली नाही तर जूनमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्याला घेराव घालण्यात येईल. त्यासाठी राज्यभरातून दीड ते दोन लाख शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव उपस्थित राहून सरकारला जाब विचारतील, असा इशारा त्यांनी दिला. सूत्रसंचालन शहराध्यक्ष कुणाल राऊत यांनी केले.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर