तुषार कांबळे हदगाव प्रतिनिधी:-
संबंध तालुक्यात रस्त्याच्या मजबुती करण्याची काम युद्ध पातळीवर सुरू असताना अतिशय आदिवासी दुर्गम भागातील रस्त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाला वावडे असल्यामुळेच की काय …? तरोडा ते मनाठा या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुती करण्याच्या कामाला पूर्ण होण्याआधीच निधी अभावी ब्रेक लागल्याचा धक्कादायक प्रकार सध्या सुरू आहे मात्र यावर सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. विशेष म्हणजे जर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध नाही असे संबंधित अभियंत्याचे म्हणणे आहे . जर निधी ची उपलब्धता नव्हती तर मग रस्त्याच्या दोन्ही बाजूला रुंदीकरणाच्या नावाखाली सामान्य प्रवाशांना धुळीच्या त्रासासाठीच खोदकाम केले की काय..? असा सवाल या मार्गावरील प्रवासी करू लागले आहेत. याच मार्गावर तालुक्यातील प्रसिद्ध हेमांडपंथी केदारनाथ महादेवाची मंदिर असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची ये-जा सुरू असते, त्याचं बरोबर मौजे पिंपळगाव येथे भव्य दिव्य जिल्हयातील सर्वात मोठे असे – श्री शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ तीर्थक्षेत्र पिंपळगाव तालुका हादगाव जिल्हा नांदेड येथे भव्य शिवपुराण कथा आणि श्री 108 कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन दि.६/३/२०२५ ते १३/३/२०२५ दरम्यान असल्याने हजारो भाविक या रस्त्याने मार्गस्थ होत आहेत परंतु रस्त्या अभावी मात्र भाविकांची गैरसोय होताना दिसून येत आहे, साधे धुळीपासून बचाव करण्यासाठी पाण्याचा सुद्धा वापर सार्वजनिक बांधकाम विभाग करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पूर्वीपासूनच या रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली आहे रस्त्यावरून वाहन चालवणे ही तारेवरची कसरत असल्याने प्रवासी आपला जीव मुठीत धरून प्रवास करत असत परंतु आता तरी रस्ता मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे मात्र रस्ता पूर्ण कधी होईल हे निश्चितपणे सांगता येणार नाही.


चोरंबा खू. ते चोरंबा बु च्या रस्त्यावर होत असलेल्या पुलाच्या बांधकामात भराव म्हणून चक्क बाजूस असलेल्या ओढ्यातील गोटया मातीचा भराव टाकून काम केले जात आहे, यावर संबंधित अभियंत्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले सध्या मुरूम उपलब्ध नसल्याने तात्पुरते व्यवस्था करत आहे पुन्हा व्यवस्थित करू.. म्हणजे एकदा पुल पुर्ण झाला की त्याला पुन्हा करनार असल्याची आगळीवेगळी प्रतिक्रिया दिली. त्याचं बरोबर याचं रस्त्यावर एका पुलाचे बांधकाम हे जमिनीच्या समपातळी पृष्ठभागाच्या खाली झाल्याने त्याचा प्रवाशांना फायदा होण्याचे ऐवजी पावसाळ्यात अपघात होण्याची दाट शक्यता आहे मग हा पूल कोण्या नियमाने करण्यात आला अशी ही कुजबूज आता होऊ लागली आहे..