मुंबई : महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात मान्सूनच्या प्रगतीसाठी अजूनही अनुकूल परिस्थिती नसून 22 जूननंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या अनेक भागांना धडकले आहे. या चक्रीवादळामुळे दुसरीकडे मान्सूनवर परिणाम झाला आहे. राजस्थानमधील पाचशेहून अधिक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. वाळवंटात पूरस्थिती पाहायला मिळत आहे. विविध दुर्घटनांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पाली, सिरोही, राजसमंद, उदयपूर, बाडमेरमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसात बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्लीत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी दिल्लीत 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर किमान तापमान 28.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. सामान्य तापमानापेक्षा एका अंशाने हे तापमान अधिक आहे. आयएमडीने दिल्लीत ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड