मुंबई : संजय शिरसाट हे स्वतः गुत्तेदारी करतात, ते मुंबईतील 72 व्या मजल्यावर राहतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 हजार स्क्वेअर फुटाचा बंगला त्यांनी कसा मिळवला याचं उत्तर द्यावं असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. माझ्या घरासमोर असलेल्या गाड्या या माझ्याच नावावर आहेत, तुमच्या घराच्या मागे असलेले जेसीबी, कोट्यवधी किमतीच्या गाड्या या कशा कमावल्या याचं उत्तर त्यांनी द्यावं असं आव्हानही त्यांनी दिलं. माझ्या नादाला लागू नका नाहीतर सगळंच बाहेर काढेन असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानतंर त्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. नीलम गोऱ्हे यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर त्यावर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत आणि शिवसेना नेत्यांच्या नावावर असलेल्या गाड्या कुणाच्या नावावर आहेत? उगाच भांडेफोड करायला लाऊ नका. आम्ही बोलायला लागलो तर तुमची इज्जत जाईल असं संजय शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाटांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, संजय शिरसाटांचा मुंबईत 72 व्या मजल्यावर फ्लॅट आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 हजार स्क्वेअर फुटाचा बंगला आणि त्या बंगल्यामागे दोन-दोन कोटींच्या गाड्या आहेत. या गाड्या कुठून आल्या?
संजय शिरसाट हे स्वतः गुत्तेदार असल्याचं अंबादास दानवे म्हणाले. शिरसाटांच्या घराच्या मागे जेसीबी, रोड रोलर आणि इतर गाड्या कुठल्या पैशांच्या आहेत ते त्यांनी जाहीर करावं. त्यांनी माझ्या नादाला लागू नये, नाहीतर मी सगळंच बाहेर काढेन असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
अंबादास दानवे म्हणाले की, “निलमताईंना चार वेळा आमदार केलं. दोन वेळा त्यांना उपसभापती केलं आणि इतर दोन पदंही दिली. त्यामुळे त्यांनी 12 मर्सिडिज दिल्या का? त्या महिला आहेत म्हणून शब्द वापरता येत नाहीत पण नमक हरामीपणा केला जातोय. इतर महिलांना संधी न देता निलम ताईंना संधी दिल्या. तुम्ही गद्दारी केली तर केली. आता आहे तिथे नीट राहा ना. औकात नसणाऱ्यांना संघटनेच्या ताकदीवर पदं मिळाली. मी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी कुठून मर्सिडिज देणार होतो. किमान बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तरी इमान राखायला हवं होतं. हे पाप तुम्हाला इथेच फेडायला लागणार आहे.”
साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. त्यांच्या सरकारी निवासस्थानी कोणताही कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आता पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्याच्या शेजारीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालय शिवालय आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच पोलिसांनी बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे.