विरार: अल्पवयीन तरुणीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचत ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना विरार येथे समोर आली आहे. व्हॉट्सअप वर ‘व्हॉईस नोट’ पाठवून अपहरण करण्यात आल्याचे तिने कुटुंबीयांना सांगितले. मात्र, पोलिस तपासात तिचं अपहरण झालेलं नसून ती प्रियकरासोबत पळून गेल्याची बाब उघड झाली आहे.
विरार येथे रहाणारी १७ वर्षीय अल्पवयीन तरुणी नेहीप्रमाणे कामावर जाण्यासाठी शुक्रवारी सकाळी निघाली. मात्र, ती कामावर गेलीच नाही. मुलगी रात्री उशीर झाला तरीही घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर या तरुणीने आपल्या भावाच्या मोबाईलवर व्हाट्सॲपद्वारे रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास एक ‘व्हॉइस नोट’ पाठवली. माझे एका व्यक्तीने अपहरण केले असून ट्रेन मधून तो मला अज्ञात ठिकाणी घेऊन जात असल्याचं तिने या व्हॉइस नोटमध्ये सांगितले. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या तिच्या कुटुंबीयांनी अर्नाळा सागरी पोलिस ठाणे गाठले आणि मुलीचे अपहरण झाल्याबाबत तक्रार दाखल केली.अर्नाळा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. ही तरुणी विमानाने आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले. या मुलीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला होता. तरूणी सुखरूप असून तिच्या ओळखीच्याच एका व्यक्तीसोबत कोलकात्ता येथे गेली असून अर्नाळा पोलिसांचे पोलिसांचे एक पथक तिला ताब्यात घेण्यासाठी कोलकात्याला रवाना झाले असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड