नांदेड दि.१७ : संजय गांधी निराधार योजनेचा मुख्य उद्देश समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे असा आहे, अशा घटकांनी समाजातील इतर घटकांवर अवलंबून न राहता स्वतःला आत्मविश्वासाने जगता यावे म्हणून ही योजना महाराष्ट्र सरकार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सुरू केलेली आहे, या योजनेअंतर्गत, निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य म्हणून सध्या दरमहा पंधराशे रुपये मानधन दिले जाते परंतु सप्टेंबर – आक्टोंबर २०२४ पासून ते आतापर्यंत नांदेड शहर व जिल्ह्यातील काही तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना अद्याप मानधन मिळाले नसल्यामुळे अंध-दिव्यांग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, वयोवृद्ध, विधवा, घटस्फोटीत महिला, परित्यक्ता महिला, अत्याचारी महिला या सर्व लाभार्थ्यांवर सध्या वाढत्या महागाईमुळे उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. शासन स्तरावरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दरमहा मानधन दिले जाते परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना गत चार – चार महिन्यांपासून मानधन दिले जात नाही, वर्षभरात बारा महिनेही लाभार्थ्यांकडून दरमहा डिबीटीच्या नावाने कागदपत्रे गोळा करून काहिना काही तांत्रिक अडचणी पुढे करून त्यांची अवहेलना केली जात आहे हि राज्यासह देशाची फार मोठी शोकांतिका असल्याचे म्हणत बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे तसेच मानधन जमा न झाल्यास पुढील आठवड्यात कुठलीच पुर्वसुचना न देता जिल्हाधिकारी कार्यालय येथील संजय गांधी निराधार अनुदान योजना कार्यालयात शेकडो लाभार्थ्यांसह तहसीलदार यांना व संबंधित सर्वच तालुक्यातील तहसीलदारांना घेराव घालण्यात येणार असल्याचे आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड