नांदेड दि.२१: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. याअंतर्गत आज बिलोली पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. बिलोली पंचायत समिती आयएसओ मानांकन मिळवणारी जिल्ह्यातील पाचवी पंचायत समिती ठरली आहे.
आयएसओ मानांकन मिळवलेल्या बिलोली पंचायत समितीच्या यशाचे श्रेय विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाते. यापूर्वी नांदेड, लोहा, मुदखेड आणि देगलूर पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले होते.
बिलोली पंचायत समितीतील आयएसओ मानांकन वितरण कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, गट विकास अधिकारी श्रीनिवास पदमावार, सहायक गट विकास अधिकारी आर.डी. क्षिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, बिलोली पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते बिलोली पंचायत समितीस आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले. या मानांकनामुळे पंचायत समितीची जबाबदारी वाढली आहे. पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कारनवाल यांनी कौतुक केले आहे.
बिलोली पंचायत समितीने केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचे प्रभावी अंमलबजावणी केली आहे. झिरो पेंडन्सीची कार्यक्षमता, तसेच विविध विभागांमध्ये केली गेलेली उत्कृष्ट कामगिरीमुळे आयएसओ मानांकन मिळाले आहे. यामध्ये सामान्य प्रशासन, शिक्षण, आरोग्य, पंचायत, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, स्वच्छता व पाणी पुरवठा अशा विविध विभागातील प्रभावी कामाची दखल घेऊन हे मानांकन देण्यात आले आहे.
बॉक्स
आयएसओ मानांकन टिकवून ठेवावे – सीईओ
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आयएसओ मानांकन टिकवून ठेवण्यासाठी कामातील नीटनेटकेपणा व परिश्रमाची आवश्यकता व्यक्त केली. भविष्यातही आयएसओ मानांकनाचे मानक पाळून सर्वोत्तम कार्य करण्याची प्रेरणा त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. तसेच नागरिकांच्या अडीअडचणी आणि तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड