निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तळकोकणात महायुतीला मिळाले बळ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश संपन्न
अमित देसाई
मुंबई दि.२४: कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळ येथील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. याच मेळाव्यात भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांच्या हाती धनुष्यबाण देत त्यांचे पक्षात स्वागत केले.
नारायण राणे यांनी शिवसेना सोडून 22 वर्षे झाल्यानंतर पुन्हा एकदा राणे कुटूंबातील सदस्याचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत असल्याने या मेळाव्याला विशेष महत्त्व होते. या पक्षप्रवेशाला माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, नीलम राणे आणि समस्त राणे कुटूंबीय उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी निलेश यांच्या शिवसेना प्रवेशासाठी तयारी दर्शवल्याबद्दल खासदार नारायण राणे यांचे आभार मानले, तसेच निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे महायुती तळ कोकणात अधिक भक्कम झाली असल्याचे मत व्यक्त केले.
तसेच नारायण राणे यांनी स्वतः ज्या शिवसेनेमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली त्याच शिवसेनेमध्ये आज त्यांचे पुत्र निलेश राणे पुन्हा प्रवेश घेत असल्याने एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत याच कुडाळ शहराने नारायण राणे साहेबाना 26 हजारांचे मताधिक्य मिळवून दिले होते मात्र आजची ही गर्दी पाहता येत्या विधानसभेत हेच मताधिक्य 52 हजार झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला. तसेच निलेश राणे यांचा विजय झाल्यानंतर या मतदारसंघात फटाके फुटतील ते पाहण्यासाठी नक्की येऊ अशी भावना व्यक्त केली.
शिवसेना वाचवण्यासाठी दोन वर्षापूर्वी माझ्यासह 50 आमदारांनी उठाव केला. या लढ्यात ज्या आमदारांनी मला साथ दिली ते सर्व आजही माझ्यासोबत आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटत असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. आमच्यावर उठसूट टीका करणारे आज मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा म्हणत दारोदारी भटकत आहेत. मात्र यांचा चेहरा मित्रपक्षांना चालत नाही तो महाराष्ट्राला कसा चालेल असा सवाल उपस्थित केला. आम्ही राणे साहेबांच्या सोबत काम केले आहे घरी बसून शिवसेना वाढत नाही पक्ष वाढत नाही त्यासाठी 24 तास काम करावे लागते त्यांची काम करण्याची पध्दत आम्ही पाहिली आहे त्यामुळे आम्हीही 24 तास काम करणारे झालो असल्याचे सांगितले.
राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असून गेल्या दोन वर्षात त्यांना न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो, लेक लाडकी लखपती योजना असो, महिलांना एस्टीमध्ये 50 टक्के सवलत असो किंवा शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या अनेक योजना असो त्यातून सर्व वर्गांना सक्षम करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
कोकणचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केला. कोकणात अनेक उद्योग आणले. दिघी बंदराच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक झाली आहे त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. तसेच कोकणातील प्रवास जलदगतीने व्हावा यासाठी मुंबई – सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता तयार करत असून त्यांचा डीपीआर आणि टेंडर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे कोकणातील लोकांचा अधिक गतीने विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले. दीपक केसरकर यांनी शिक्षण विभागात विद्यार्थांचे सर्वांगीण हित लक्षात घेऊन अनेक बदल केले असल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत निलेश राणे, नितेश राणे, दीपक केसरकर आणि किरण सामंत या महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, शिवसेनेचे राजापूर मतदारसंघातील उमेदवार किरण सामंत, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे आणि शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच हजारो नागरिक उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्यूज #ठाणे