जालना: विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उतरणार की नाही याबाबत उत्सुकता होती. याबाबतचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर जाहीर केला.अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीनंतर जरांगे यांनी आपली भूमीका जाहीर केली. जिथे आपले उमेदवार निवडून येतील, तिथे उमेदवार उभे करावे असा माझा विचार आहे असं जरांगे यांनी जाहीर केलं. शिवाय राखीव प्रवर्गात आपण उमेदवार देऊ नये, जो आपल्या विचारचा आहे त्याला निवडून आणावे असा सल्लाही त्यांनी यावेळी समाजाला दिला आहे.
मनोज जरांगे हे सरसकट सर्व जागांवर उमेदवार उभे करणार नाहीत. ज्या मतदार संघात उमेदवार निवडून येईल त्या ठिकाणी उमेदवार उभे करू असेही त्यांनी सांगितले. मात्र सर्वांकडून अर्ज भरून घेणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोणाचे अर्ज मागे घ्यायचे ते आपण ठरवू असेही ते म्हणाले. त्यावेळी तुम्हाला ज्याला पडायचे त्यांना पाडा, ज्यांना उभे करायचे त्यांना उभे करा असेही त्यांनी स्पष्ट केले. माझी निवडणुकीची किंवा राजकारणाची भूमिका नाही.निवडणुकीच्या नादात आंदोलनापासून दुर जावू नका असेही जरांगे यावेळी म्हणाले. सर्व मराठी एक राहीले तर आपला विजय असेल असा दावाही त्यांनी यावेळी केला.
आपण उमेदवार उभे केले तर भाजपा वाले खुश होतील. नाही केले तर महाविकास आघाडी वाले खुश होतील असंही ते यावेळी म्हणाले. मात्र ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी मैदानात उतरण्याची भूमीका जरांगे यांनी मांडली आहे. मात्र एकूण किती जागांवर हे उमेदवार असतील हे मात्र असूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा समाजाचे किती उमेदवार रिंगणात दिसतात हे पहावे लागेल. शिवाय उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती अर्ज मागे घेतले जातात. त्यात कोणाला समर्थन दिले जाते हे ही उत्सुकतेचे असेल.
मराठा समाजाने निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी मागणी केली जात होती. जवळपास 800 जणांचे उमेदवारी अर्जही जरांगे यांच्याकडे आले होते. त्यांच्या मुलाखतीही जरांगे यांनी घेतल्या होत्या. त्यात आता निवडून येणाऱ्या जागांवर उमेदवार देण्याचे त्यांनी ठरवले आहे. शिवाय ज्या ठिकाणी आपल्या विचारांचे उमेदवार असतील त्यांना पाठिंबाही त्यांनी जाहीर केला आहे. शिवाय एससी एसटी विरोधात उमेदवार उभे करू नका असेही त्यांनी सांगितले.