छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी
विजय पाटील
दि २५ : ३२ वर्षीय युवकाने १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात रविवारी (२२ सप्टेंबर) समोर आली आहे. संदीप सोपान मापारी असे संशयिताचे नाव असून, त्याच्याविरुद्ध शिऊर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित संदीप तिच्या शेजारीच राहतो. मुलगी त्याच्या बायकोसोबत गप्पा मारायला जात असे. एक दिवस तो मुलीच्या घरी आला. तेव्हा मुलगी एकटीच होती. त्याने तिचा हात धरत ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू मला आवडतेस’ असे म्हणून लगट केली. दीड महिन्यापूर्वी त्याने तिला शेजारील शेतात भेटण्यासाठी बोलावले. तू मला भेटण्यासाठी आली नाही तर तुझ्या आई व भावाला चाकूने खुपसून देईल, अशी धमकी त्याने दिल्याने ती शेतात भेटायला गेली.
मकाच्या शेतात त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतरही त्याने संधी मिळेल तसे तिच्या शरीराचे लचके तोडले. काही दिवसांपूर्वी तिला बोलावून घेत आपण पळून जाऊन लग्न करू, असे त्याने म्हटले. मात्र मुलीने नकार दिला. त्यावर त्याने आई व भावाला मारण्याची धमकी देऊन जबरदस्ती त्याच्या दुचाकीवर बसवून नांदगावमार्गे वणी येथे नेले. तेथून दर्शन करून मढी येथे एका भक्त निवासात मुक्कामी थांबत तिच्यावर बलात्कार केला. जवळचे पैसे संपले म्हणून २२ सप्टेंबरला सायंकाळी त्याने तिला पुन्हा शिऊरला आणले आणि घरी सोडले. सोमवारी मुलीने शिऊर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी संदीपला बेड्या ठोकल्या.
#सत्यप्रभा न्यूज छत्रपती # संभाजीनगर