लातूर प्रतिनिधी !विजय पाटील दि : २३येथील शासकीय दूध योजना प्रकल्पातील भंगार विक्री संदर्भात काढलेली निविदा रद्द करण्याचे आदेश राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली असून या दुध डेअरी संदर्भात लवकरच केंद्र शासनाच्या एनडीडीबी च्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार असल्याचे राज्याचे क्रीडा मंत्री ना. संजय बनसोडे यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत ना. विखे पाटील यांनी सांगितले आहे अशी माहिती उदगीर दूध डेअरी पुनरुज्जीवन समितीचे सदस्य संतोष कुलकर्णी यांनी दिली. उदगीर येथे 1978 साली निर्माण करण्यात आलेली शासकीय दूध योजना मागच्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत पडून आहे. ही शासकीय दूध योजना महाराष्ट्र शासनाने सुरू करावी अशी मागणी उदगीरकरांमधून होत असताना राज्य शासनाने घेतलेल्या धोरणानुसार उदगीरची शासकीय दूध योजनाही भंगारत काढण्यात आली. येथील भंगार उचलण्यासाठी वृत्तपत्राद्वारे विविध मागविण्यात आली होती. उदगीरची शासकीय दूध योजना महाराष्ट्र शासनाने चालवावी अन्यथा केंद्र शासनाच्या एनडीडीबी मार्फत नागपूर येथील दूध डेअरीच्या धरतीवर चालविण्यात यावी अशी मागणी उदगीर येथील शासकीय योजना पुनरुज्जीवन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. यापूर्वी महाराष्ट्र शासनाने एनडीडीबीकडे या संदर्भाचा प्रस्तावही पाठवला होता. मात्र असे असतानाही पुढील कार्यवाही पूर्ण व्हायच्या अगोदरच उदगीरच्या शासकीय दूध योजनेतील भंगार उचलण्यासंदर्भाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने भंगार उचलण्यासाठी संबंधित कंत्राटदार दूध डेअरीत दाखल झाले. या प्रक्रियेला उदगीरच्या सुजाण नागरिकांनी व शासकीय दूध योजना पुनरुज्जीवन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन करून विरोध केला. आज सोमवारी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर दूध डेअरी पुनरुज्जीवन समितीचे पदाधिकारी संतोष कुलकर्णी, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, उदगीर येथील गोरक्षण संस्थेचे संचालक प्रशांत मांगुळकर यांना सोबत घेऊन राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली.
यावेळी ना. संजय बनसोडे यांनी दुध डेअरी संदर्भात उदगीरकरांच्या भावना दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर मांडल्या. उदगीरकरांच्या भावनांची दखल घेऊन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ उदगीर येथील भंगार उचलण्यासाठी दिलेले आदेश रद्द करीत असल्याची माहिती या बैठकीत दिली. शिवाय उदगीरची दूध डेअरी चालू करण्यासंदर्भात येत्या दोन-तीन दिवसातच केंद्र शासनाच्या एनडीडीबीचे अधिकारी यांच्यासोबत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले असल्याची माहितीही संतोष कुलकर्णी यांनी दिली.
#सत्यप्रभा न्यूज # लातूर