तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश
हिंगोली दि.03: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नदी-नाले काठावरील गावे, शेतीपिकांचे आणि रस्ते, पूल बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करावेत. यामध्ये एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश अल्पसंख्यांक विकास, औकाफ, पणन मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिले.
पालकमंत्री दोन दिवसांच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले असता, आज सकाळीच कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव, डोंगरगाव पुल आणि हिंगोली तालुक्यातील सावरखेडा आणि आडगाव तसेच हिंगोली शहरातील बांगर नगर व आजम कॉलनी येथे पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संजय कुलकर्णी, उप विभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, प्रतीक्षा भुते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह विविध यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.
सद्यस्थितीत प्रमाणापेक्षाही जास्त नुकसान झाले असून, जिल्ह्यातील नदी-नाले काठावरील शहरी आणि ग्रामीण भागाला याचा मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागातील शेतीपिकांसह गुरे-ढोरे, पशुधन, दुभती जनावरे वाहून गेली आहेत. पुराच्या पाण्याने रस्ते आणि पुलांचे भाग तुटल्यामुळे गावांचा संपर्कही तुटला आहे. त्यामुळे तो तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. सत्तार यांनी जिल्हा यंत्रणेला दिले.
पुराच्या पाण्यामुळे वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचे खांब पडले असून, हा वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा. तसेच पूरग्रस्त भागात साथीचे रोग पसरण्याची भिती असून, त्यासाठी आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागाने पावसामुळे होणाऱ्या साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याचे काम करावे. तसेच पशुधन वाचविण्यासाठी तातडीने खबरदारीच्या उपाययोजना करताना लसीकरणाला प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. नुकसान भरपाई देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने योग्य समन्वय साधत तातडीने पंचनामे सुरू करावेत. या कामासाठी आवश्यकतेनुसार कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी व इतर तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी यांची पथके गठीत करून पंचनामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
पालक मंत्री अब्दुल सत्तार भर पावसात पोहचले शेतक-यांच्या बांधावर…
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असून, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेत मंगळवारी सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर भर पावसात पोहचत त्यांना धीर दिला.
हिंगोली तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या गावातील शेतकऱ्यांना पालकमंत्री श्री. सत्तार यांनी भेट देत धीर दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राज्य शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. काळजी करू नका, राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून निधी मिळविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या शासन निर्णयानुसार प्रयत्न करणार असल्याचा त्यांनी विश्वास दिला.
सर्वांनी एकत्रित येऊन सर्व यंत्रणेने मदत करावी. अस्मानी संकटाचा मुकाबला करताना सर्वांना एकजुटीने काम करावे लागणार आहे. यामध्ये सर्व विभागाच्या योग्य समन्वयातून तातडीने मार्ग काढण्यात येईल. पशुधन आणि शेती तसेच पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांना राज्य शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. येणाऱ्या कालावधीत अतिवृष्टी बाधित भागांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वस्तुनिष्ठ आकडेवारी समोर येईल. त्यानुसार मदत देणे सोईचे होणार असल्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड