नांदेड दि.२२: सध्या भोकर मतदारसंघात लाडक्या बहीण योजनेचे पोस्टर्स गावोगाव उभे करण्यात आले आहेत. आता त्याच्यावर धुळही साचली आहे.
जगात पोस्टरबाजीने सगळं साध्य झालं असतं तर सत्तेसाठी, खुर्चीसाठी नको त्याच्या चौकटी झिजवायची वेळ आली नसती. बंद खोलीत पायाही पडायची गरज नसती. पोस्टरबाजी एक सुकून असतो, जसेकी दारुड्याला दारू पिल्यावर एक सुकून मिळतो अगदी तसाच सुकून! असो…
“तुम्ही लाडक्या बहीण योजनेतील दररोजच्या ५० रुपयांचे काय उदात्तीकरण करता; या देशात दररोज ८७ बलात्कार होतात, त्यावर बोला!” देशात दरवर्षी NCRB कडून बलात्कार नोंदी एकत्रित केल्या जातात. देशात वर्ष २०२२ मध्ये एकूण ३१,५१६ बलात्कार केसेस नोंद झाल्यात म्हणजे दररोज ८७ बलात्कार घडले आहेत तर वर्ष २०२१ मध्ये ३१,६७७ बलात्कार केसेस नोंद झाल्या असून या वर्षातही दररोज ८७ बलात्कार घडलेले आहेत. तर २०२३ मधील आकडेवारी अजून आलेली नसलेली तरी आकडे काही वेगळे असणार नाहीत. २०२४ या चालू वर्षातही तीच बोंब आहे.
परंतू राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असून अवैध धंदे जसे काय ‘परवानाधारक’ धंदे आहेत असे दिसतात – त्यामुळे यातूनही अनेक सामाजिक समस्या उद्भवतात, त्याचे काय ? तेव्हा याचा विचार कोण करणार ? देशात बेरोजगारीचा दर वाढलाय, शाळाबाह्य मुलांची संख्याही वाढली असून उदरनिर्वाहासाठी ते धडपडत आहेत. नको त्याच्या संपर्कात आल्याने गुन्हेगारी वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात गावठी कट्टे काय कमी सापडत नाहीत. तेव्हा इतर शहरांची अवस्था काय असेल ? बदलापूरची घटना असो की, कोलकात्यात घडलेली घटना असो ती माणूस म्हणून आम्हाला लांच्छनास्पद आहे.
“तेव्हा लाडक्या बहीण योजनेत आमच्याच पैशातून दररोज ५० रुपये काय हातात ठेवता; या देशात दररोज ८७ महिलांवर बलात्कार होतात तेव्हा शरमेने मान खाली जाते.” त्यावर इथल्या नेत्यांच्या तोंडून ब्र निघत नाही. आम्हाला आमच्याच टॅक्स मधून ५० रुपये काय देता, त्याचे उदात्तीकरण करून मताचा जोगवा मागण्यापेक्षा इथल्या कायदा व सुव्यवस्थेवर बोला, आमच्या लेकी सुरक्षित नाहीत त्याचे काय ?
#सत्यप्रभा न्युज #नांदेड