संभाजीनगर आंतरजातीय विवाह खून प्रकरणी अंनिसची मागणी !
पिडीत कुटुंबांची तसेच पोलिस आयुक्त यांची अंनिसच्या शिष्टमंडळाने घेतली भेट!
छत्रपती संभाजीनगर दि.३: आंतरजातीय विवाह केल्याच्या रागामधून झालेल्या हल्यात जखमी अमित साळुंखे या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यात संभाजीनगर येथे घडली. या पार्श्वभूमीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तातडीने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी ‘सेफ हाउस’ कार्यान्वित करावीत अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत करण्यात आली आहे.
प्रसिद्धी पत्रात पुढे म्हटले आहे
की, महाराष्ट्र अंनिस गेली तीस वर्षे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना पाठबळ देण्याचे काम करते. अशा जोडप्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र अंनिस मार्फत सातारा येथे पोलीस दलाच्या सहकार्याने स्नेहआधार हे सुरक्षा निवारा केंद्र देखील चालू केले आहे. आंतरजातीय/धर्मीय विवाह केलेली जोडपी या सुविधेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्र राज्य गृहविभागाच्या आदेशा नुसार अशा स्वरुपाची सुरक्षा निवारा केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उभी करणे आवश्यक आहे. औरंगाबादमध्ये असे सुरक्षा निवारा केंद्र असते तर अमित साळुंखे याचा खून टाळता येवू शकला असता. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात विनाविलंब सेफ हाउस कार्यान्वित करावीत अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त केली आहे.
या विषयी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, या घटने मधील आंतरजातीय विवाह केलेले जोडपे अमित साळुंके आणि विद्या कीर्तीशाही दोघेही संभाजीनगर पोलिसांच्याकडे सुरक्षा मागणीसाठी गेले असता त्यांना कोणतीही मदत न करता परत पाठवण्यात आले. विद्याचे वडील गीताराम भास्कर कीर्तीशाही आणि चुलत भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तीशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते याकडे देखील अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. या स्वरूपाचे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही केली जावी अशी देखील मागणी या पत्राच्याद्वारे करण्यात आली आहे.
अंनिसच्या पत्रकात असे देखील नमूद केले आहे कि, जोपर्यंत अशी यंत्रणा कार्यान्वित होत नाही तो पर्यंत गरज असलेल्या जोडप्यांना राज्यभरातून सातारा येथे असलेल्या सुरक्षा निवारा केंद्रात पाठवण्यात यावे अशी देखील विनंती राज्य शासनाला करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अंनिस मार्फत डॉ. हमीद दाभोलकर, सम्राट हटकर, मुंजाजी कांबळे, राहुल थोरात,शंकर कणसे, डॉ. दीपक माने, मोहसीन शेख, मधुकर गायकवाड, शंकर बोर्डे, व्यंकट भोसले, फारुख गवंडी, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, विनोद वायंगणकर, प्रवीण देशमुख, मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर यांनी हे पत्रक काढले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसच्या शिष्टमंडळाने औरंगाबाद पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनमध्ये अशा घटने प्रसंगी मदत मागण्यास आलेल्या जोडप्यास कशा प्रकारे समुपदेशन आणि आधार देणे या विषयी पोलीस दलाचे प्रशिक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे असे नमूद केले आहे तसेच असे प्रशिक्षण औरंगाबाद विभागाच्या साठी आयोजित करावे असे देखील आवाहन केले आहे. आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी शासन परिपत्रक १९ डिसेंबर २०२३ नुसार संभाजीनगर येथे सेफ हाऊस सुरू करावे. याबाबत आयुक्तांनी संबंधितांना बोलावून व फोनवरून तात्काळ सूचना दिल्या.तसेच अमित साळुंखे याच्या खुनाच्या कटातील बाकीच्या साथीदाराना देखील तातडीने अटक करावी अशी मागणी देखील या पत्रकात करण्यात आली आहे.
अंनिसच्या कार्यकर्त्यांची पिडीत कुटुंबांशी भेट :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या घटनेतून खून झालेल्या अमित साळुंखेची पत्नी विद्या व कुटुंबीयांची इंदिरानगर परिसरात असणाऱ्या त्यांच्या घरी भेट घेतली. त्यावेळी सुरक्षेसाठी त्यांच्या घरासमोर एक पोलीस नियुक्त करण्यात आला आहे. आरोपी अटकेत आहेत तरीही त्यांना असुरक्षित वाटत आहे. त्या परिसरात आरोपीचे नातेवाईक व जातभाई बहुसंख्यांक असल्याचे दडपण यांच्यावर आहे. आपल्या जीवाला धोका आहे अशी दोघांनीही पोलिसात तक्रार दिली होती. यावर काहीही कार्यवाही झाली नाही. अमितला भोकसले तेव्हापासून आरोपी फरार होते, जवळपास बारा दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी सापडले. अमितचा खून हा पूर्वनियोजित कट आहे व त्यात आणखी काही जण होते, त्यांना पण आरोपी करावं असं विद्याच म्हणणं आहे. याविषयी पोलीस आयुक्तांशी आम्ही बोललो होतो, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आमच्या समक्ष तसे निर्देश दिले. अडचण आल्यास पोलिसांशी संपर्क साधा, अंनिसची काही मदत लागल्यास कळवण्याबाबत त्यांना सांगितले.
अंनिसच्या शिष्टमंडळात अंनिस सेफ हाऊसचे संचालक शंकर कणसे, राज्य कार्यकारणी सदस्य सम्राट हटकर, मुंजाजी कांबळे, डॉ. दीपक माने, मोहसीन शेख, मधुकर गायकवाड, शंकर बोर्डे, पी .यू आरसूड, जालना, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथील अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष व्यंकट भोसले, जिल्हा प्रधान सचिव लक्ष्मण जांभळीकर यांचा समावेश होता.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड