नांदेड (प्रतिनिधी) दिनेश येरेकर:वंचित. बहुजन आघाडीच्या वतीने बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव यांच्या घृण हत्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आज दिनांक 5 जून रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.
दिनांक १ जून 2023 रोजी बोंढार हवेली येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असलेल्या अक्षय भालेराव यांची गावातील गावगुंड यांनी पोटात चाकू खुपसून निर्घृणपणे हत्या केली आहे. सदरील हत्या जातीय द्वेष भावनेने झालेली असून या भागात अनेक वेळा याच पद्धतीने हल्ले बौद्ध व इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समुदायावर होत आहे. नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत असून नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीने हौदोस घातला आहे. भविष्यात अक्षय भालेराव सारख्या घटना पुन्हा घडू नये. यासाठी या गुन्ह्यातील आरोपींना कडक शासन होणे गरजेचे असून सदरील घटनेचा तपास तात्काळ करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून गुन्हेगारांना कडक शासन होईल या पद्धतीने सबळ पुराव्यासह आरोपपत्र दाखल करण्यात यावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. त्याच बरोबर सदरील प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना कडक शासन करण्यात यावे, पीडित कुटुंबाला तात्काळ 50 लाखाची आर्थिक मदत करण्यात यावी, या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, बोंढार हवेली या गावातील अल्पसंख्यांक बौद्ध व इतर मागासवर्गीय समाजाला दीर्घकाळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, हदगाव तालुक्यातील वाळकी या गावातील मातंग समाजावरीलं खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, कुंटूर पोलीस ठाणे अंतर्गत झालेल्या अमोल पवार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे, नांदेड जिल्ह्यातील ज्या ज्या गावात दलित, सवर्ण असा जातीय तेढ आहे. अशा गावांमध्ये सर्व समाजाच्या नेत्यांना सोबत घेऊन शासनाने अशा गावांमध्ये समन्वय बैठकांचे आयोजन करावे आदी मागण्या या आंदोलनात करण्यात आले आहेत. # सत्यप्रभा न्यूज #नांदेड