मुंबई दि.१६: मराठ्यांनी १०० टक्के मतदान करून मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना इतक्या ताकदीनं पाडावे की, इथून पुढे त्यांना मराठ्यांच्या मतांची खरी किंमत कळली पाहिजे. त्यांना मराठ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे. पाडण्यातही मोठा विजय आहे, हे मराठा समाजानं लक्षात घ्यावं. महायुतीनं आम्हाला फसवलं आहे, आता मराठा समाज यांचा राईट कार्यक्रम करेल! सरकारला आमच्या छातीत लागलेल्या गोळ्या दिसत नाहीत. मराठा समाजाला आता बरोबर कळलय कुणाच्या विरोधात मतदान करायचं. मराठे कुणाच्याही सभांना जात नाहीत. निकालाच्या दिवशी राईट कार्यक्रम होईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीसांवर जरांगेंनी सोडले टीकास्र:
मी अजून राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगतो, तुम्ही माझ्या नादाला लागू नका. मी निष्ठावान माणूस आहे! मी माझी जात कधीच विकू शकत नाही. मला तुम्ही आंदोलनात हलक्यात घेतलं होतं, मला राजकारणात हलक्यात घेऊ नका. मला तिकडे जायचं नाहीये. पण मला राजकारणात ओढायचा प्रयत्न केला, तर तुमचा कायमचा कार्यक्रम लागेल, एवढे लक्षात ठेवा!
देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे. आमच्या माय-माऊलींवर गोळ्या घालणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बढती दिली आहे. पोलिसांच्या माध्यमातून चार महिन्यांपूर्वीचे गुन्हे कालपर्यंत दाखल करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे ते गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखे आहेत, असे उपरोधिक बोलत मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
…अन्यथा पुन्हा उपोषण करणार!:
येत्या ४ जूनपर्यंत जर राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही, तर पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. एवढेच नाही तर आगामी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत उतरू आणि राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करु!
आगामी काळात दलित, मराठा, मुस्लीम, लिंगायत, बारा बलुतेदार असे सगळे आम्ही एकत्र येणार आहोत. महायुतीवाल्यांनी दोन उपमुख्यमंत्री केले, आमचे सात उपमुख्यमंत्री होऊ द्या, असे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात मनोज जरांगे पाटलांनी सूचक विधान केलं आहे, यामुळे राजकीय वर्तुळात निरनिराळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड