86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार प्रथम प्रशिक्षण
नांदेड दि. ३१ : जगातल्या सर्वात मोठया लोकशाही देशाच्या मताधिकार स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्यासाठी आपण निवडणूक कार्यावर आहोत. लोकशाहीच्या या अभिव्यक्ती मध्ये निवडणुकांमधील मताधिकार, मतदान प्रक्रिया राबविताना राष्ट्रीय कर्तव्याचे भान प्रत्येक कर्मचाऱ्यांने ठेवावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.
८६ -नांदेड उत्तर विधानसभा मतदार प्रथम प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. निवडणुकीच्या महत्त्वाच्या टप्प्यात आता आपण पोहोचलो असून या टप्प्यामध्ये बिनचूकपणे सामान्य माणसाला त्याचा मताधिकार पूर्ण करता येईल, यासाठी प्रयत्न करायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 16-नांदेड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत, 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील अधिकारी / कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण, EVM Handson Training सह दि.30/03/2024 रोजी सचखंड पब्लीक स्कुल, गुरु ग्रंथ साहिब भवन, नांदेड येथे आयोजीत करण्यात आले होते. प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात आले.
प्रशिक्षणाच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अभिजीत राऊत यांचे ललितकुमार व-हाडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) नांदेड यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरुवात झाली, प्रत्येक मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी ‘‘चुनाव का पर्व, देश का गर्व’’ या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील येणा-या संभाव्य समस्यांबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या. तसेच सदर समस्यांचे निराकरण प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केल्यास निवडणूक पार पाडणे घेणे अधिक सुलभ होते, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रशिक्षणात केले.
दोन्ही सत्रात श्री. ललितकुमार व-हाडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी (रोहयो) नांदेड यांनी विस्तृतपणे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या (सादरीकरणाच्या) माध्यमातून मतदान प्रक्रिया सुरु झाल्यापासून ते समाप्त होईपर्यंतची कामे करण्याबाबत प्रशिक्षण दिले. यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) व VVPAT (Voter Verifiable Paper Audit Trail) व्ही.व्ही.पॅट यंत्रासंबंधी महत्वपुर्ण माहिती देण्यात आली. निवडणूकीशी संबंधित विविध फॉर्म्स कसे भरतात, कोण-कोणत्या समस्या येवू शकतात व त्या समस्यांचे उपाय कोणते याबद्दल सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. सदरील प्रशिक्षण संवादात्मक व चर्चात्मक पध्दतीने घेण्यात आले. यावेळी प्रशिक्षण मंचावर श्री.रामदास कोलगणे, व तहसिलदार प्रगती चोंडेकर, श्री.बालाजी सोनटक्के, नायब तहसिलदार हे उपस्थित होते.निवडणूक कार्यप्रणाली व मतदान केंद्रावरील कर्तव्ये, विविध फॉर्म, विविध प्रपत्रे, संवैधानिक व असंवैधानिक लिफाफ्याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) वापराबाबतची सुलभ प्रक्रीया चर्चेव्दारे समजावून सांगण्यात आली व प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांचे / शंकांचे निरसन करण्यात आले. प्रत्येक सत्रातील पहिल्या टप्प्यात माहिती विषयक प्रशिक्षण दिले तर, दुस-या टप्प्यात प्रत्यक्ष ई.व्ही.एम. वापराचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणास सुमारे 1800 कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या प्रत्येक सत्राच्या दुस-या टप्प्यात सर्व क्षेत्रिय अधिकारी आणि EVM मास्टर ट्रेनर यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) व VVPAT (Voter Verifiable Paper Audit Trail) व्ही.व्ही.पॅट प्रत्यक्ष हाताळणीबाबतचे प्रशिक्षण उपस्थित कर्मचारी यांना देण्यांत आले. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) जोडणी कशी केली जाते याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणात टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करण्यासाठी निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठीचा अर्ज नमुना 12 अ व टपाली मतपत्रिकेची मागणी नोंदविण्यासाठीचा नमुना 12 भरुन टपाली मतपत्रिका प्राप्त करणेबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक कर्तव्यावर राहून सूध्दा मतदान करता येईल ही जाणीव करून देण्यात आली.
प्रशिक्षणाच्या ठिकाणी विविध कर्मचारी यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी एकूण 15 टेबलवर 30 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच मतदार सहायता कक्ष, रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीकेचे अग्निशमन दल, शहर वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस, यांना पाचारण करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाच्या ठिकाणी आवश्यक त्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. या प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन श्री.रामदास कोलगणे, तहसिलदार व श्रीमती प्रगती चोंडेकर, तहसिलदार यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्व अधिकारी / कर्मचारी विशेष परिश्रम घेतले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड