नांदेड दि.३०: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात येणाऱ्या मिरखेल-मालटेकडी या ४५ कि.मी. लोहमार्गावर गुरुवारी (दि.२८) विद्युत रेल्वेची सीआरएस चाचणी दमरेच्या प्रिन्सीपल ऑफ चिफ इलेक्ट्रीकल इंजिनिअर पी.डी. मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी मिरखेल येथून दोन विद्युत इंजिन असलेली एका आठ डब्यांची पहिली विशेष रेल्वे धावली. यामुळे आता या लोहमार्गावरुन विद्युत रेल्वे धावण्यास लवकरच सुरूवात होणार आहे.
दमरेच्या सिकंदराबाद मुख्य विभाग, नांदेड रेल्वे विभागासह एकूण ९२४ कि.मी. लोहमार्गाच्या कामाचे विद्युतीकरण पुर्णत्वास गेले असुन परभणी-मुदखेड लोहमार्गावर गुरुवारी (दि.२८) दमरेच्या मुख्य इलेक्ट्रीकल इंजिनिअर विभागाच्या वतीने प्रलंबित मिरखेल ते मालटेकडी दरम्यानच्या विद्युतीकरणाच्या झालेल्या कामाची तपासणी करून विद्युत रेल्वेची सीआरएस चाचणी घेण्यात आली. दुपारच्या वेळी दोन विद्युत इंजिन असलेली आठ डब्यांची एक विशेष रेल्वे मिरखेल स्थानकावर आली होती. यामध्ये सिकंदराबाद येथिल प्रिन्सीपल ऑफ चिफ इलेक्ट्रीकल इंजिनिअर पी.डी. मिश्रा, सहा. विभागीय व्यवस्थापक आर. के. मीना, सहा. परिचलन व्यवस्थापक विवेकानंद यलप्पा, विनोद साठे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्युतीकरणातील तांत्रिक बाबीची पाहाणी केली. यानंतर २५ हजार व्होल्ट विद्युत प्रवाह विद्युतीकरण केलेल्या तारांमध्ये सोडण्यात आला. सायंकाळी ४.१५ घ्या सुमारास उद्घाटन करुन ही विशेष रेल्वे पूर्णा मार्गे मालटेकडीकडे धावली. या पहिल्या विद्युत रेल्वेचे चालक प्रदिप कुमार, गार्ड अरुण कुमार यांचा सत्कार करण्यात करुन मिरखेल स्टेशन मास्तर अख्तर पाशा यांनी हिरवा झेंडा दाखवून विद्युत रेल्वेला रवाना केले. सिकंदराबाद येथून आलेल्या पथकाने सोबतच विविध ठिकाणच्या
कामाची पाहणी केली. दरम्यान, नांदेड येथून दाखल झालेल्या या अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने पूर्णा, चुडावा, लिंबगाव सोबतच मिरखेलपर्यंत सर्व ठिकाणी ही चाचणी केली. तसेच चुडावा येथील सबस्टेशन परिसरात विविध कामांची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी सबस्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. संबंधित पथकाच्या पाहणीनंतर आता पुढे काही दिवसांमध्ये या मार्गावरील नांदेड, पूर्णा, परभणी, परळी, अकोला सोबतच अन्य मार्गावरील विद्युत रेल्वे पुर्ण क्षमतेने धावतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड