नांदेड दि.३०: पुण्यातील मोदीबाग येथील निवासस्थानी कराळे मास्तरांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेऊन लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले होते. आता, कराळे मास्तरांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे, कराळे मास्तर आता वर्ध्यातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे दिसून येते.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी उद्या ३० मार्च रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी कराळे मास्तरांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्याने वर्ध्यातून लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार साहेब व जयंत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून हा प्रवेश घेण्यात आला आहे. केंद्रात सत्तेत असलेलं मोदी सरकार पाडण्यासाठी आपण एकजुटीने लढले पाहिजे. या भूमिकेतून मी हा निर्णय घेतल्याचेही कराळे मास्तरांनी पक्षप्रवेशानंतर म्हटले. तसेच, पुढील काही दिवसांत मी सोशल मीडियातून माझी भूमिका मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी कराळे मास्तर मातोश्रीवर आले होते. मात्र, मातोश्रीवर त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे, उद्धव ठाकरेंची भेट न झाल्याने मास्तरांनी नाराजी व्यक्त केली होती. आता, ऐन लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर कराळे मास्तरांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
वर्ध्याची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आली आहे. मात्र, उमेदवार ठरविताना पक्षाच्या नाकीनऊ आले होते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांना ‘तुतारी’वर लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला नव्हता. त्यामुळे काळे यांच्या उमेदवारीविषयी संभ्रम निर्माण झाला होता. अखेरीस शुक्रवारी सायंकाळी त्यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश घेतला आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड