४४ लाखाची रोकड, ७ लाखाचे मद्य, १६ लाखाचे साहित्य जप्त इडी,आयटी,आरटीओ, उत्पादन शुल्क,वन व अन्य विभागांकडून जप्ती सुरू
नांदेड दि. २० : आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यात कडेकोट तपासणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. दररोज या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत असून या यंत्रणांनी कोणाचीही हयगय न करता जप्ती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. जिल्ह्यात सायंकाळपर्यंत ४४ लाखाची रोकड, ७ लाखाचे मद्य व १६ लाखाचे अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. पोलीस,अंमलबजावणी संचालनालय, इन्कम टॅक्स, परिवहन, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क,प्राप्तीकर, महसुल, अंमली पदार्थ नियंत्रण दल, सिमा सुरक्षा बल, अंमलबजावणी संचालनालय, परिवहन, डाक विभाग, नागरी उडयन विभाग विभागाचे अधिकारी उपस्थिती होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या कालावधीसाठी ‘इलेकशन सिझर मॅनेजमेंट सिस्टीम ॲपची निर्मिती आयोगाने केली आहे. निवडणूक काळात कुठलेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून यात सर्व सहभागी शासकीय यंत्रणा, पथके बारकाईने लक्ष ठेऊन कारवाई करतात. रोकड, अवैध मद्यसाठा, अंमली पदार्थ वा शस्त्र अशी कुठलीही जप्तीची कारवाई केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ती माहिती त्वरित या ॲपमध्ये समाविष्ट करावी लागणार आहे. त्यामुळे या कारवाईची माहिती लगेचच निवडणूक आयोगाला मिळणार आहे. तथापि, या यंत्रणेचा आणखी सक्रिय वापर करण्याचे निर्देश आज जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले. 44 लाखाची रोकड, ७ लाखाचे मद्य, 16 लाखाचे अन्य साहित्य आतापर्यंत जप्त करण्यात आले या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व सीमांवर ज्यांचे ज्यांचे तपासणी कक्ष आहेत त्या ठिकाणी काटेकोरपणे कारवाई करण्यात यावी, तपासणी दरम्यान ज्या यंत्रणेचे घटनास्थळावर पोहोचणे आवश्यक असेल त्यांनी तातडीने त्या ठिकाणी पोहोचावे यासंदर्भात नियुक्त फ्लाईंग स्क्वाडला माहिती द्यावी. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यामध्ये अवैध वाहतूक दारूची तस्करी आणि बेनामी रोकडीचे वहन होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी डोळ्यात तेल घालून काम करावे असे सक्त निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, मनपाचे मुख्य लेखाधिकारी डॉ. जनार्दन पक्वाने, आयटीचे संतोष निलेवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड