नांदेड दि. १३ :- नांदेड येथे १५ते १९फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने विविध शिवकालिन खेळ, स्पर्धा व महाराष्ट्राचा लोकोत्सव अशा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने नांदेडवासियांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी मिळणार असून या कार्यक्रमात नांदेडवासियांनी सहकुटूंब सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
महासंस्कृती महोत्सवादरम्यान १५ ते १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ५ या कालावधीत शिवकालिन विविध मैदानी खेळांचे आयोजन पोलीस कवायत मैदान, पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या मागे करण्यात आले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवामोंढा, नांदेड येथील मैदानावर १६फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ते रात्री १० या कालावधीत महाराष्ट्राचा लोकोत्सव या कार्यक्रमात सुप्रसिध्द सिने व नाट्य कलावंताचा बहारदार कार्यक्रम तसेच प्रथीतयश स्थानिक कलावंताचे लोककलेचे सादरीकरण होणार आहे.
महोत्सवात विविध खेळ, स्पर्धा व लोकोत्सवाचा समावेश
आदिवासीचे पारंपारिक नृत्य व कलेचे होणार सादरीकरण
स्थानिक कलाकांरासोबत सुप्रसिध्द सिने व नाट्य कलावंताचे सादरीकरण
१७ फेब्रुवारी रोजी सायं. ६ते रात्री १०या कालावधीत ‘आदि माया आदि शक्ती ‘ या कार्यक्रमात सुप्रसिध्द सिने व नाट्य कलावंताच्या बहारदार कार्यक्रमाचे तसेच प्रथीतयश स्थानिक कलावंताचे लोकसंगीताचे कार्यक्रम होणार आहेत. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत लोकनृत्यावर आधारित जल्लोष २०२४या बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. १६ ते १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत प्रदर्शनिय दालने यात जिल्हा व जिल्हा बाहेरील विविध स्टॉल लावण्यात येणार आहेत. १८ व १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ या कालावधीत आयटीआय येथे शिवचरित्रारवर आधारित रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १७ व १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायं. ५ या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील विविध घटना, ठिकाण, निसर्ग, पर्यटन इत्यादी बाबीवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन नंदगिरी किल्ला, होळी परिसर नांदेड येथे करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद नांदेडवासियांनी सहकुटूंब घ्यावा, असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्राचा लोकोत्सव’ या कार्यक्रमात निवेदन संदीप पाठक तर नृत्य माधुरी पवार, अभिजीत केळकर हे करतील तर गायन मनीष राजगिरे, ज्ञानेश्वर मेश्राम, पद्यनाभ गायकवाड यासोबत ४५ कलाकारांचा संच असणार आहे. दि. १७फेब्रुवारी रोजी आदिमाया आदि शक्ती या कार्यक्रमात निवेदन पूर्वी भावे, कौस्तुभ दिवाण हे तर नृत्य सुकन्या काळण, राजेश्वरी खरात, आरती शिंदे, श्वेता खरात आणि प्रार्थना बेहेरे हे करणार आहेत. तर गायन आनंदी जोशी, चेतन लोखंडे यासोबत २५ कलाकारांचा संच असणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी जल्लोष या कार्यक्रमात निवेदन ज्ञानदा रामतीर्थकर तर नृत्य नेहा खान, गौरी कुलकर्णी, जुई बेंडखळे, विदिशा म्हसकर तर गायन सावनी रविंद्र, मयुर सुकाळे हे करतील. तर स्किट अंशुमन विचारे आणि किशोरी अंबिये यासोबत २५ कलाकारांचा संच सहभागी असणार आहे. या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम व किनवट येथील पारंपारिक नृत्याचे कलाप्रकार सादर होणार आहेत. या महोत्सवात माध्यम प्रतिनिधी व कुटुंबियांसाठी विशेष आसन व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिक, माध्यमांचे प्रतिनिधी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड