Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार (Ajit Pawar) गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास सांगितले आहे.
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वाना होती. आता पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आगामी निवडणुका वेगळ्या चिन्ह आणि नावाने लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग मोकळा केल्याने आमदार अपात्रतेचा निर्णयही अजित पवारांच्या बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक निकालानंतर अजित पवार गटाची आज देवगिरीत महत्त्वाची बैठक होत आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक सुरु आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे मंत्री, नेते आणि आमदार उपस्थित आहेत.
बैठकीत निकाल आणि पुढील रणनीती, राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकांसह छगन भुजबळांच्या नाराजीवरही चर्चा होणार आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू आहे.