छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !
दि : २२/०१/२०२४
राज्य शासनाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगास दिलेल्या सुचनेनुसार आयोगामार्फत शहरी व ग्रामीण भागात मराठा व खुल्या प्रवर्गातील जातीचे 23 जानेवारीपासून सर्वेक्षण करून माहिती जमा करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने काल प्रगणक व पर्यवेक्षक यांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण जालना तहसील कार्यालयात पार पडले. दि. 23 जानेवारी 2024 पासून सुरू होणाऱ्या या सर्वेक्षणदरम्यान कुटुंबप्रमुखांनी आपली माहिती प्रगणकांना प्राधान्याने द्यावी, असे आवाहन जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांनी केले आहे.
तसेच मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करणेसाठी गठीत समितीचे अध्यक्ष न्यायमुर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समितीस तपासण्यात आलेल्या नोंदी व कुणबी जातीच्या आढळून आलेल्या नोंदीबाबतची माहिती यापूर्वी सादर करण्यात आली आहे. मात्र, काही गावांमध्ये कुणबी जातीच्या नोंदी सापडलेल्या नाहीत अथवा अत्यल्प सापडलेल्या
आहेत. याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार अशा गावांमधील ग्रामस्थांनी त्यांच्याकडील कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे संबंधीत अभिलेखे / पुरावे तहसील कार्यालयात जमा करावे, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.
सत्यप्रभा न्यूज