नांदेड दि.१८: महाराष्ट्रातील शेतकरी वर्गावर अत्यंत बिकट प्रसंग आलेला आहे. एकीकडे शेती व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत तर दुसरीकडे सरकार निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, वायदे बंदी, बेसुमार आयती करून शेतीमालाचे भाव पाडत आहे. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्या ऐवजी सरकार भीक दिल्यासारखे किरकोळ कर्जमाफी देत आहे. शेतीसाठी वीज पुरवठा, पीक विमा, वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान असे अनेक प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित आहेत.
शेतकऱ्यांच्या खालील मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली, दिनांक १८ जानेवारी रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत. सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. म्हणून सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी. शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्णं दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा. वन्य प्राण्याकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत किंवा शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी. पीक विम्यामध्ये होणारी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करून विम्याचा योग्य लाभ देणारी योजना आमलात आणावी.
शेतकऱ्यांच्या वरील मागण्यांचा गांभीर्याने विचार करून शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे. आंदोलन केल्या शिवाय सरकारला समस्या असल्याची जाणीव होत नसल्यामुळे नाईलाजाने आंदोलन करावे लागत आहे.
शेतकरी संघटनेचा मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वाजत गाजत नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा प्रमुख शिवाजीराव शिंदे आणि त्रिभुवन सिंह ठाकुर यांनी केले. मोर्चामध्ये आपल्या व्यथा मांडण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड