श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध जनावरे घेऊन पशुमालक दाखल झाले आहेत. उच्च प्रतीची जनावरे मिळण्याचे दक्षिण भारतातील महत्वाचे ठिकाण म्हणून यात्रेचा लौकिक आहे. याठिकाणी व्यापाऱ्यांची अनेक वस्तु विक्रीची दुकाने थाटली. शेती आणि घरातील उपयोगाच्या लहान-मोठ्या वस्तु या यात्रेत नागरिक खरेदी करीत असल्याने यावर्षीही व्यापारपेठ मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या लहान मुलांपासून थोरा-मोठ्या पर्यंतच्या सर्व प्रकारच्या मनोरंजनाच्या गोष्टींनी ही यात्रा सजली आहे. लोककलाच्या सादरीकरणासाठी कलावंतांच्या संचांनी ठिकठिकाणी तंबू थाटले आहेत. मनोरंजनाच्या खेळांचे अनेकविध प्रकारही दाखल झाले आहेत.
जिल्हा परिषदेने दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांसाठी कृषिविषयक स्पर्धा, पशुपालकासाठी स्पर्धा, पशु प्रदर्शन यांचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्या वतीने सन 2023-24 वर्षातील डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने 19 शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय लोककला, आणि लावणी महोत्सवही यात्रेचे मोठे आकर्षण आहे. यात्रेसाठी आरोग्यविषयक सुविधा आणि पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड