छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी! विजय पाटील !
दि : ०९/०१/२०२४
2001 पूर्वी मान्यता मिळालेल्या राज्यातील महाविद्यालयांना अनुदाना देण्यासंदर्भात आठ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधीत अधिकार्यांना दिले असल्याचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले.
24 नोव्हेंबर 2001 पूर्वी मान्यता मिळालेल्या राज्यातील महाविद्यालयांच्या अनुदानासंदर्भात आज (दि.9) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. 24 नोव्हेंबर 2001 पूर्वी मान्यता मिळालेली राज्यातील जवळपास 78 महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयांना अनुदान पात्र करण्यासाठी 5 वेळेस तपासण्या देखील झाल्या. मात्र अद्यापही सदरील महाविद्यालयांना अनुदान पात्र घोषित करण्यात आलेले नाही. संस्थाचालक मागील 22 वर्षांपासून ही महाविद्यालय चालवत आहेत. तसेच महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षकांनाही आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सदरील महाविद्यालयांना तात्काळ अनुदान पात्र घोषित करून सदरील महाविद्यालयांना अनुदान पात्र करतांना 2023 च्या वर्क लोड नुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची पदे मान्य करावीत अशी आग्रही मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदरील महाविद्यालयांचे संचालक स्तरावर आलेले प्रस्ताव आठ दिवसांच्या आत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले. तसेच शासनाकडे प्रस्ताव सादर झाल्यानंतर मंत्री मंडळाची मंजूरी घेऊन सदरील महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात तसेच शासनाने राज्यात 2001 पूर्वी अनुदानीत महाविद्यालयांना विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या तुकड्या व विद्या शाखांना अनुदान पात्र करण्यासाठी देखील त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना उपस्थित अधिकार्यांना दिल्या असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अशोक मांडे, उच्च शिक्षण विभागाच्या संचालक कार्यालयाचे प्रतिनिधी, मंत्रालयातील संबंधित अधिकारी, संस्थाचालक प्रतिनिधी गोविंदराव देशमुख आदींची उपस्थिती होती.
सत्यप्रभा न्यूज