नांदेड दि.२७: देगलूर तालुक्यातील होट्टल हे गाव चालुक्यकालीन मंदिरासाठी जगप्रसिद्ध आहे. याठिकाणी महादेव मंदिर, पार्वती मंदिर, परमेश्वराचे मंदीर, खंडोबाचे मंदिर आणि भवानी मंदीर आहे. तसेच देगलूर हे या भागातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. होट्टल फाटा ते कुशावाडी दरम्यान खुप मोठे खड्डे झाले असून गेल्या महिन्याभरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र प्रशासन झोपेचे सोंग घेतले आहे असे जनतेकडून सांगण्यात येते. होट्टल, करडखेड, येरगी आणि रामपुर या गावांना पर्यटन झोनमध्ये जोडले जाईल असे तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले होते तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी देगलूर ते होट्टल रस्त्याचे काम लवकरच पुर्ण होईल असे होट्टल महोत्सवात सांगितले होते. अद्याप हा रस्ता होऊ शकला नाही. त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जेव्हा होट्टल महोत्सव असतो तेव्हाच या रस्त्याची मलमपट्टी केली जाते. मात्र हा रस्ता कायमस्वरूपी चांगला व्हावे ही जनतेची मागणी आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रशासनावर चांगलीच पकड असल्याचे सांगण्यात येते, या रस्त्याच्या बाबतीत प्रशासनाची भुमिका काय असणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. #सत्यप्रभा न्युज #नांदेड