नांदेड दि. 21 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रवेश परीक्षा शासकीय आश्रमशाळा बोधडी ता. किनवट जि. नांदेड व एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, सहस्त्रकुंड ता. किनवट जि. नांदेड येथे रविवार 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज किनवट प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय अनुदानीत आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल, सहस्त्रकुंड मुख्याध्यापकाकडे विनामुल्य उपलब्ध आहेत.
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगर पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी, 6 वी, 7 वी, व 8 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित/आदिम जमातीचे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये प्रवेश परिक्षेसाठी पात्र राहणार आहेत.
पात्र विद्यार्थ्यांचे पूर्ण भरलेले विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी 17 फेब्रुवारी, 2024 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट जि. नांदेड यांच्याकडे सादर करावेत, असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड