मुंबई दि.९: खरी शिवसेना कोणाची, बंडखोर आमदार कोण आणि त्यातील अपात्र कोण या साऱ्या मुद्यांवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाची परीक्षा विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. या सुनावणीत रोज वेगवेगळे टर्न घेतले जात आहेत. या निकालावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सरकारचे भवितव्य ठरणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिंदे यांच्यासह तेरा आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी ठाकरे गटाने केलेली याचिकेची सुनावणी ३१ डिसेंबरपर्यंत संपविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. ही सुनावणी कधी संपेल आणि तिचा निकाल काय लागेल, याची खात्री कोणी देऊ शकत नसले तरी या सुनावणीतील ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना कोंडीत पकडल्याचे दिसून आले आहे. सहा तास चाललेली ही उलटतपासणी ही साऱ्या केसमधील महत्वाचा टप्पा ठरली.
एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या पत्रावर २३ आमदारांच्या सह्या; ठाकरे गटाने शिंदेंना खिंडीत पकडलं
त्यामागचे नाट्यही तेवढेच रंगतदार आहे. शिंदे यांनी २० जून २०२२ च्या रात्री पहिले बंड केले. तेव्हा त्यांच्यासोबत १३ आमदार पहिल्यांदा सुरतला पोहोचले. शिंदे त्यानंतर गुवाहटीला गेले. तेथे त्यांना सेनेचे इतर आमदार मग मुंबईहून तेथे येऊ लागले. शिंदे यांचे बंड शमत नसल्याचे स्पष्ट होताच इकडे तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या गटानेही हालचाली सुरू केल्या. लगेचच २१ जूनला वर्षा बंगल्यावर उर्वरीत आमदारांची बैठक घेण्यात आली. तेव्हा २३ आमदार हे ठाकरे यांच्यासोबत होते. या बैठकीत शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्याचा ठराव झाला. या ठरावावर या आमदारांच्या सह्या होत्या. या सह्या केल्यानंतरच अनेक आमदार मग ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले. शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० आमदार आले. त्यानंतर ठाकरे यांनी राजीनामा दिला. शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता या साऱ्या सुनावणी २१ जूनची ठाकरे यांच्याकडील बैठक महत्वाची ठरली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड