Election Results 2023 : देशात चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून (Election Results 2023) आता बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत पुन्हा मोदी फॅक्टर चालला आहे. लोकांनी मोदींच्याच नावावर भाजपाच्या पारड्यात भरभरुन मतांचं दान केलं अन् सत्ताधीश होण्याच्या दिशेने वाट करून दिली. या राज्यांपैकी छत्तीसगड आणि राजस्थानात काँग्रेसची सत्ता होती. या दोन्ही राज्यांत भाजपने विजयी आघाडी घेतली आहे. तर मध्यप्रदेशातही काँग्रेसला खूप मागं ढकललं आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही भाजपाच्या यशावर प्रतिक्रिया देत इंडिया आघाडीला जोरदार टोला लगावला आहे. “मन, मन में मोदी असा निकाल”या चार राज्याच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला आहे, असे सीएम शिंदे म्हणाले.
चार राज्यांच्या निवडणुकीतील यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले, आतापर्यंत लोक म्हणत होते घर घर मोदी पण आता मन मन मोदी असा हा निकाल लागला आहे. अनेक लोक म्हणत होते की मोदींचा करिष्मा संपला. या निवडणुकीत काही लोक भारतीय जनता पार्टीचा पराभव होणार असे म्हणत होते. खूप मोठे षडयंत्र रचले गेले. मोदींवर आरोप केले गेले. परंतु, शेवटी निकाल जनतेच्या हातात असतात. जनताच निवडणुकीत किंग असते आणि जनतेने पुन्हा मोदींनाच साथ दिली. काँग्रेसचे राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली पण परदेशात जाऊन भारत तोडो म्हणत देशाची बदनामी ते करत होते. पंतप्रधान मोदींचीही बदनामी ते करत होते. त्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला. त्यांना त्यांची जागा दाखवली. हे लोकांना मान्य नसतं. देशावर प्रेम करणारे लोक देशात आहेत.
मागील वेळी राहुल गांधी यांनी दहा दिवसांत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन दिलं होतं. कर्नाटकमध्ये सुद्धा खूप मोठी आश्वासन देऊन जनतेला धोका देऊन ते निवडून आले. परंतु, नंतर त्यांच्याच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी विकासकाम करण्यासाठी पैसा नाही असा खुलासा केला. त्यामुळे आजच्या निवडणुकीत मोदींजींच्या विचारांचा विजय झाला आहे. आगामी निवडणुकांत देशातील जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड